#स्व. भानूताई गडकरी संस्थेचा सेवाभावी उपक्रम
नागपूर :- स्व. भानूताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने काल ९ ते २१ वर्षे वयोगटातील युवतींसाठी निःशुल्क सर्व्हायकल कॅन्सर लसीकरण शिबिराचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सेवासदन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी, सचिव वासंती भागवत, भानुताई गडकरी विकास संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. स्व. भानूताई गडकरी संस्था व कॅन्सर पेशंट एड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भाजपच्या ज्येष्ठ नेत्या स्व. रुपाताई रॉय यांच्या स्मरणार्थ युवतींसाठी गर्भाशयमुख कर्करोगापासून संरक्षणात्मक उपाय म्हणून ९ ते २१ वयोगटातील युवतींसाठी निःशुल्क सर्व्हायकल कॅन्सर लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी ९०० हून अधिक युवतींनी सेवासदन शिक्षण संस्था सीताबर्डी येथे निःशुल्क लसीकरण घेतले.
अशा प्रकारच्या वॅक्सिन शिबिरांचे आयोजन केल्याने कॅन्सरच्या वाढत्या प्रमाणवर नियंत्रण ठेवता येईल व स्त्रियांचे आरोग्य निरामय राखता येईल असे उद्गार नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. याप्रसंगी नितींजींच्या हस्ते कॅन्सर एड असोसिएशनच्या डॉ. नुपूर खरे, यांचा सन्मान करण्यात आला. शिबिरात सहभागी होणाऱ्या युवतींचे सर्व्हायकल कॅन्सरच्या बाबतीत डॉक्टरांच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात येईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालरोगतज्ञ डॉ. गिरीश चरडे तर कार्यक्रमाचे संचालन डॉ श्रीरंग वराडपांडे यांनी केले असून शिबिराच्या यशस्वीतेसाठी कु दिंपी बजाज,सौ. वर्षा ठाकरे,श्री बाळकृष्ण, डॉ प्रिया, डॉ. नाझिया, डॉ. अजय सारंगपुरे, डॉ.अशा गजभिये आदींचे सहकार्य लाभले.