– डॉ. प्रणिता उमरेडकर यांनी स्वीकारला पुरस्कार
नागपूर :- केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (MOHUA), स्मार्ट सिटी मिशन आणि पिंपरी-चिचवड स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर (NSSCDCL) ला ‘भारतातील शहरांमध्ये हेल्दी स्ट्रीट्स’ तयार करण्यात अग्रेसर असल्याबद्दल उत्कृष्टतेचा पुरस्कार मिळाला आहे.
पिंपरी-चिंचवड येथील माडगूळकर सभागृहात ‘रस्ते आणि सार्वजनिक जागा’ या विषयावरील आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय कार्यशाळेत केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव श्री. कुणाल कुमार यांच्या हस्ते नागपूर स्मार्ट सिटीला पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागपूर स्मार्ट सिटीच्या पर्यावरण विभाग आणि स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंजच्या नोडल अधिकारी डॉ. प्रणिता उमरेडकर, (GM, I/c) यांनी पुरस्कार स्वीकारले. “इंडिया सायकल फॉर चेंज अँड स्ट्रीट्स फॉर पिपल चेलेंज फेज-२” मध्ये स्मार्ट सिटीज मिशन आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या पुढाकाराने २९ शहरांमधून नागपूरसह देशातील शीर्ष १५ अग्रणी शहरांची निवड करण्यात आली होती.
नागपूर शहरातील रस्त्यांचे जाळे सुधारण्यासाठी आरोग्यदायी पथ धोरण विकसित करणे, संस्थात्मक उभारणी आणि शहर पातळीवर क्षमता वाढवणे तसेच शहरातील आरोग्यदायी (हेल्दी) रस्त्यांच्या पायाभूत सुविधा वाढविण्याबाबत एक आदर्श निर्माण करण्यासाठी अग्रेसर असणाऱ्या नागपूरला उत्कृष्टतेचा पुरस्कार देण्यात आला आहे.
नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्मार्ट सिटीच्या कामाचे आणि संपूर्ण शहरात पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सुधारणा करण्याच्या योजनांचे कौतुक केले आहे. तसेच नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बीपी. यांनी पादचाऱ्यांच्या सुरक्षितते संदर्भात पायाभूत सुविधांना पाठींबा देऊन, योग्य धोरणे राबवित क्षमता वाढवण्याच्या कार्यशाळा आणि “नॉन मोटारीज्ड ट्रान्सपोर्टसाठी” पायाभूत सुविधांच्या आधारे रस्त्याच्या मालकीच्या एजन्सीद्वारे सुविधा पुरवून सर्वसमावेशक दृष्टिकोन विकसित करणार असा विश्वास व्यक्त केला आहे.
पुरस्कारासाठी नोडल अधिकारी डॉ. प्रणिता उमरेडकर यांनी कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, हर्षल बोपर्डीकर यांचे आभार व्यक्त केले आहे. डॉ. उमरेडकर यांनी नागपूर स्मार्ट सिटीचे अध्यक्ष आणि मेंटर डॉ. संजय मुखर्जी व स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या सदस्यांचेही आभार मानले आहे.