पुणे :- नवमतदारांनी लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात उत्साहाने सहभागी व्हावे आणि प्रथम मतदान करून हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्यावतीने आयोजित युवक मेळाव्यात सहभागी युवकांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे डॉ.दिवसे यांनी संवाद साधला. यावेळी उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, तहसिलदार राधिका बारटक्के उपस्थित होते.
डॉ.दिवसे म्हणाले, मतदानाद्वारे आपण चांगले प्रतिनिधी निवडूण देवू शकतो. देशाचे भविष्य असलेल्या युवकांनी या प्रक्रियेत सहभाग वाढाविणे गरजचे आहे. नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वर्षभरात अनेक उपक्रम राबविले आहे. तरीदेखील जिल्ह्यातील युवकांच्या लोकसंख्येच्या तुलनेत केवळ २५ ते ३० टक्के मतदारांनी मतदार नोंदणी केली आहे.
पुणे, शिरुर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी करून इच्छिणाऱ्या युवकांसाठी १५ एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपर्यंत मतदार नोंदणी करण्याची संधी आहे. युवकांनी निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ https://voters. eci.gov.in किंवा वोटर हेल्पलाईन ॲपवर आपल्या जागेवरच मतदार नोंदणी करण्याची सुविधा आहे. मतदार नोंदणीसाठी केवळ रहिवासी आणि वयाचा पुरावा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
वयोवृद्ध मतदारांचा आदर्श समोर ठेवा
जिल्हाधिकारी म्हणाले, लोकशाही बळकट करण्यात वयोवृद्ध मतदारांचे मोठे योगदान आहे. जिल्ह्यात 85 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांना द्यावयाच्या सुविधेबाबत त्यांच्याशी संपर्क केला असता मतदान केंद्रावर अभिमानाने मतदान करण्याची इच्छा अधिकांश ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. त्यांच्या या कर्तव्यभावनेचा आदर्श युवकांनी समोर ठेवावा आणि मतदार नोंदणी तसेच मतदानात सहभाग घ्यावा. महाविद्यालयाच्या विविध उपक्रमातदेखील उत्साहाने सहभागी होऊन नेतृत्वगुण आणि संवादकौशल्य विकसित करावे. समाज माध्यममांचा उपयोग सकारात्मकता निर्माण करण्यासाठी करावा आणि आपल्या सहभागातून समाज आणि देश समृद्ध करावा, असे आवाहन त्यांनी केले.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाने लोकशाही व्यवस्था स्वीकारली. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची ओळख आहे. अनेक देशात महिलांना मताधिकारासाठी लढा द्यावा लागला, मात्र भारताने स्वातंत्र्यानंतर संविधानाद्वारे महिलांना मताधिकार प्रदान केला. अशा लोकशाही व्यवस्थेत निवडणुकीला महत्व असताना पुण्यासारख्या शहरी भागात राज्यात होणाऱ्या सरासरी मतदानापेक्षा कमी मतदान होते. लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करणे महत्वाचे आहे, असेही दिवसे म्हणाले.