संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीमध्ये आगामी 5 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार असून या गावांमध्ये सध्या प्रचाराची धूम सुरू आहे.या 10 ग्रामपंचायती मध्ये 35 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे तर गावपुढाऱ्यांना प्रचारा करिता शेवटचे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.
कामठी तालुक्यातील बाबूलखेडा,वारेगाव,कवठा, नेरी,उमरी, गारला,नान्हा मांगली,चिकना,वरंभा,चिखली या 10 ग्रामपंचायती ची सार्वत्रिक निवडणूक 5 नोव्हेंबर ला असून 10 ग्रा प च्या 10 सरपंच व 31 सदस्य पदासाठी निवडणूक होत आहे.या निवडणुकीत एकूण 16 हजार 927 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून यामध्ये 8 हजार 801 पुरुष तर 8 हजार 126 स्त्री मतदाराचा समावेश आहे.3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रचार थांबणार आहे.या 10 गावात 35 मतदान केंद्रावर 5 नोव्हेंबर ला मतदान तर 6 नोव्हेंबर ला कामठी तहसील कार्यालयात मतमोजणी होईल. निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुव्यवस्थेत पार पडण्यासाठी कामठी तहसील प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून पोलीस प्रशासनानेही याकडे लक्ष केंद्रित केले आहे. येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातुन होऊ घातलेल्या या ग्रामपंचायतिच्या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.