कोरेगाव भीमा येथील शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक न्याय विभाग करणार – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

-विजयस्तंभ शौर्यदिनाचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना

-विजयस्तंभ परिसर विकास व सुशोभिकरणासाठी आराखडा समिती

मुंबई : शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाच्या परिसरात मूलभूत सोयी-सुविधा, सुशोभिकरण व अन्य विकासाची कामे तसेच शौर्य दिन,  अन्य अल्पकालीन व दीर्घकालीन उपक्रमांचे आयोजन व नियोजन यापुढे सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात येणार आहे. येत्या 1 जानेवारी रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात झालेल्या बैठकीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली.

            सामाजिक न्याय मंत्री श्री.मुंडे म्हणाले, दरवर्षी 1 जानेवारी रोजी देशभरातून कोरेगाव भीमा येथे अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात, त्यांना आवश्यक सोयी-सुविधा तसेच विजयस्तंभ व परिसराचा विकास कमीत कमी वेळेत केला जावा यासाठी व्यापक प्रयत्न केले जातील, या अनुषंगाने नियोजन करण्यात यावे. विजयस्तंभ ऐतिहासिक असून लाखो अनुयायांचे प्रेरणास्थळ आहे. या स्थळाचा विकास व सुशोभीकरण यासाठी 100 कोटी रुपयांचा बृहत विकास आराखडा तयार करून मान्यतेसाठी एक महिन्याच्या आत सादर करावा, असेही श्री.मुंडे यांनी सांगितले.

             विजयस्तंभ व परिसराचा विकास करताना भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जावी यासाठी जिल्हाधिकारी, पुणे, यांच्यामार्फत भूसंपादन प्रक्रियेचा 30% निधी तातडीने वितरित करण्याच्या सूचनाही सामाजिक न्याय मंत्री श्री.मुंडे यांनी दिल्या.

            यापुढे 1 जानेवारी शौर्यादिनाचे आयोजन व नियोजन देखील सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत केले जाणार असून, 1 जानेवारी, 2022 च्या शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाचे काटेकोरपणे नियोजन केले जावे, तसेच या अभिवादन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्याचे नियोजन करण्यात यावे, अशा सूचना देखील श्री.मुंडे यांनी पोलीस, महसूल व अन्य संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

            बृहत विकास आराखडा तयार करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी व समाज कल्याण आयुक्त यांची समितीही गठीत करण्यात आली आहे. याशिवाय एक जानेवारीच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठीही एक समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, पुण्याचे पोलीस आयुक्त, बार्टीचे महासंचालक धम्मज्योति गजभिये, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.

            बैठकीस अपर मुख्य सचिव श्रीमती जयश्री मुखर्जी, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सहसचिव दिनेश डिंगळे, गृह विभागाचे सहसचिव संजय खेडकर, पुणे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती संगीता डावखरे  आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

जलजीवन मिशन योजनेंतर्गत राज्यातील 60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना मंजुरी

Wed Dec 15 , 2021
-पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक मुंबई : जलजीवन मिशन योजनेंतर्गत राज्यातील दरडोई निकषापेक्षा जास्त असलेल्या 60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना, राज्यातील 858 कोटीच्या कामांना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.             बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!