बेला :- जवळच्या बोरगाव (लांबट) येथील सेवा सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच अविरोध पार पडली. त्यामध्ये काँग्रेसचे ईश्वर लांबट यांच्या गटाचे तेराही उमेदवार अविरोध निवडून आले. मंगळवार 18 एप्रिल ला गट ग्रामपंचायतचे कार्यालयात पार पडलेल्या कार्यकारणीच्या निवडणुकीत ईश्वर ज्ञानेश्वरराव लांबट यांची सोसायटीवर चौथ्यांदा अध्यक्षपदी तर रामभाऊ आनंदराव बटाले यांची उपाध्यक्षपदी अविरोध निवड झाली. या निवडीबद्दल त्यांचे परिसरात अभिनंदन होत आहे. निर्वाचित 13 सभासदांमध्ये स्वतः ईश्वर लांबट, सुरेश महादेव लांबट, रामभाऊ आनंदराव बटाले, अशोक मनोहर बेंडे, अशोक मोतीराम लांबट, दिलीप माणिक बोबडे,आशिष मनोहर बेले, नथू आत्माराम क्षीरसागर हे सर्वसाधारण गटातून महिला राखीव गटातून शोभा आनंदराव अंबाडरे व कुसुम विनायक बटाले, इतर मागास प्रवर्गातून शंकर डोमाजी लांबट तर भटक्या विमुक्त जाती जमाती मधून रमेश आसाराम वाघाडे निवडून आले. यांचे विरोधात कोणत्याही उमेदवाराने नामनिर्देशन पत्र सादर न केल्यामुळे ईश्वर लांबट यांच्या गटाचे संपूर्ण तेरा उमेदवार अविरोध विजयी झाले. बोरगाव (लांबट) येथील गट ग्रामपंचायतच्या कार्यालयात पार पडलेल्या कार्यकारिणीच्या निवडणुकीत टी.एल.इटनकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. अध्यक्षपदी लांबट व उपाध्यक्षपदी बटाले यांची निवड जाहीर होताच समर्थकांनी त्यांचे गुलाल उधळून जल्लोषात स्वागत केले.
बाजार समितीची निवडणूक लढणार
ईश्वर लांबट हे बोरगाव (लांबट) सेवा सोसायटीचे अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवडून आले आहे. ग्रामपंचायत मध्ये सुद्धा त्यांच्या गटाचे पाच सभासद आहेत. ते ज्येष्ठ व अनुभवी कार्यकर्ते असल्याने त्यांची बाजार समितीचे संचालकपदी यंदा वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांनी येत्या 13 मे ला होणाऱ्या उमरेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत नामनिर्देशन पत्र भरले असून त्यांची उमेदवारी काँग्रेस प्रणित गटातून जवळपास निश्चित मानल्या जात आहे .