भाजपा – एनडीए 400 जागांचा टप्पा पार करणार – ओडिशामधील सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

बरगढ :- लोकसभा निवडणुकीत एनडीए 400 जागांचा टप्पा पार करणार आणि ओडिशामध्ये डबल इंजिन सरकार बनणार, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्यक्त केला. 50 जागाही मिळवू न शकणारी काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष म्हणून विरोधी बाकावर देखील बसू शकणार नाही अशी खिल्लीही मोदी यांनी उडवली. ओडिशातील कंधमाल, बोलंगीर आणि बरगढ येथे आयोजित केलेल्या प्रचंड जाहीर सभांना संबोधित करतांना पंतप्रधानांनी काँग्रेसबरोबर बिजू जनता दलालाही आपल्या टीकेचे लक्ष्य केले. आदिवासींच्या जमीनी हडपणाऱ्या आणि सामान्य माणसाला केंद्राच्या कल्याणकारी योजनांच्या लाभांपासून वंचित ठेवणा-या नवीन पटनायक सरकारला त्यांची जागा दाखवा, त्यासाठी भाजपा उमेदवारांना विजयी करा असे आवाहनही त्यांनी केले. विकसित ओडिशा, विकसित भारतासाठी एक-एक मत महत्वाचे आहे असे सांगत सर्वच्या सर्व 21 खासदार ओडिशातून दिल्लीत पाठवा आणि ओडिशा विधानसभेतही भाजपाला बहुमत द्या, अशी सादही त्यांनी घातली. केंद्रीय मंत्री आणि संबलपूरचे उमेदवार धर्मेंद्र प्रधान, कंधमालचे उमेदवार सुकांत कुमार पाणिग्रही, बोलंगीरच्या उमेदवार संगीता कुमारी देव आदी यावेळी उपस्थित होते.

भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगत आणि विकासाची दृष्टी ठेवत भाजपा सरकार देशाला प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी अहोरात्र कार्य करीत आहे, असे नमूद करीत मोदी यांनी येथील मातीशी नाते असणारा, संस्कृतीचा अभिमान असणाराच ओडिशाचा मुख्यमंत्री बनेल असा विश्वास व्यक्त केला. 26 वर्षांपूर्वी अटलजींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात आजच्याच दिवशी पोखरण अणू चाचणी करून बलशाली देशाचे चित्र जगासमोर ठेवले होते याची आठवण पंतप्रधान मोदींनी करून दिली. देशभक्तीने प्रेरित होऊन सरकार देशहितासाठी, देशाच्या सुरक्षेसाठी आणि भारतीयांच्या आशा आकांक्षांसाठी कसे काम करते हे अटलजींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने आणि गेली 10 वर्ष मोदी सरकारने दाखवून दिले आहे. एकीकडे अणुचाचणी करणारे भाजपा सरकार तर दुसरीकडे पाकिस्तानच्या अणुबॉम्बची भीती घालणारे काँग्रेस नेते, यातला फरक मतदारांनी ओळखावा, असेही मोदी म्हणाले.

मोदीची हमी म्हणजे हमी पूर्ण होण्याची हमी आहे हे लोकांना आता ठाऊक आहे. युवकांना स्वत:चा व्यवसाय़ सुरु करण्यासाठी मुद्रा योजने अंतर्गत विना तारण 10 लाखांऐवजी 20 लाखांचे कर्ज देण्याची हमी मोदींनी दिली आहे. ओडिशा भाजपा ने 3100 रुपये प्रति क्विंटल दराने धान खरेदीची आणि 48 तासांत पैसे खात्यात जमा करण्याची हमी दिली आहे. मसाला पार्क स्थापन करण्याची हमी दिली आहे. तेव्हा या मोदीवर भरोसा ठेवत आम्हाला एक संधी द्या आम्ही राज्याला अव्वल बनवू, असा शब्द पंतप्रधान मोदी यांनी दिला. श्री जगन्नाथ मंदिरातील सोने चांदी, आभूषणे,रत्ने ,सर्व संपत्तीचे मूल्यांकन करण्याचा नियम 7 दशकांपूर्वीच बनला होता. बिजू जनता दल सरकारच्या काळात या भांडाराच्या चाव्याच गहाळ झाल्या. जे सरकार श्री जगन्नाथाच्या रत्न भांडाराचे रक्षण करू शकत नाही ते तुमचे रक्षण काय करणार असा सवाल करत श्री.मोदी यांनी बिजू जनता दल सरकारवर प्रहार केला. चाव्या नेमक्या कुठे गेल्या?, देवस्थान भांडारातील किमती सामानाची चोरी झाली का? असे प्रश्न विचारत पंतप्रधान मोदी यांनी बिजू जनता दल सरकारला कोंडीत पकडले.

भाजपा हा मुद्दा उपस्थित करत असताना बिजू जनता दलाचे सरकार मात्र याबाबत मौन बाळगून आहे. हे सरकार कोणाच्या पापावर पांघरूण घालत आहे याबाबत जनतेने विचार करावा असे नमूद करत मोदी यांनी ओडिशामध्ये आम्हाला एकदा संधी द्या, आम्ही श्री जगन्नाथ मंदिराच्या रत्न भांडाराच्या कारभारात पारदर्शकता आणू अशी हमीही दिली. भाजपा चे लक्ष्य गरीब कल्याण आणि विकास आहे असे सांगत पंतप्रधान म्हणाले की, एक जरी गरीब देशात असला तरी मला चैन पडणार नाही. आत्तापर्यंत 25 कोटी जनतेला आमच्या सरकारने गरीबीतून बाहेर काढले आहे. गरीबांना मोफत धान्य आणि पक्क्या घराची हमी भाजपा ने दिली आहे. या योजनांचा ओडीशातील आदिवासी समाजाला मोठा लाभ झाला आहे. पंतप्रधान–सूर्यघर मोफत वीज योजने अंतर्गत छतावरील सोलार पॅनेलसाठी केंद्राकडून प्रत्येक कुटुंबाला 78 हजार रुपयांपर्यंत सबसिडी देण्यात येते. यातून मोफत वीज मिळते आणि जास्तीची वीज विकून कमाई करता येते. आयुष्मान योजनेमुळे देखील देशात कुठेही 5 लाखांपर्यत मोफत इलाज होतो. मात्र अशा अनेक कल्याणकारी योजनांमध्ये ओडीशातील बिजू जनता दल सरकार खोडा घालते. त्यामुळे या लाभांपासून येथील जनता वंचित राहत आहे. ओडिशा नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आहे, पर्यटनाच्या अनेक संधी आहेत. मात्र बिजू जनता दल सरकारच्या उदासिनतेमुळे विकास ठप्प आहे. अशा असंवेदनशील, निष्क्रीय आणि तुम्हाला केंद्राच्या कल्याणकारी योजनांच्या लाभांपासून वंचित ठेवणा-या सरकारला धडा शिकवा असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले.

पंतप्रधान म्हणाले की, विकसित ओडिशा आणि विकसित भारताच्या संकल्पासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीत एक-एक मत अत्यंत महत्त्वाचे आहे. या निवडणुकीत प्रथमच ओडिशाने डबल इंजिन सरकार बनवण्याचा आणि भाजपाला लोकसभेच्या सर्व 21 जागांवर विजयी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाची 500 वर्षांची प्रतीक्षा भाजपा सरकारच्या काळातच पूर्ण झाली आणि आज अयोध्येत भव्य राम मंदिर पाहून देशाला अभिमान वाटतो.

आदिवासी कन्या आणि देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू रामललाचे दर्शन घेऊन आल्या तेव्हा दुसऱ्या दिवशी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने घोषणा केली की आता आम्ही राम मंदिर गंगाजलाने धुवून शुद्ध करू. हा देशाचा, आदिवासी समाजाचा आणि माता भगिनींचा अपमान आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजींचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या सर्व जागांची अनामत रक्कम जप्त करावी, असा घणाघातही पंतप्रधानांनी केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगला महावितरणचे बुस्टर

Sun May 12 , 2024
नागपूर :- इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी लागणारी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी महावितरणला राज्याची नोडल एजन्सी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. महावितरणच्या पुढाकाराने नागपूर परिमंडलात एकूण 65 चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आली आहेत. यात महावितरणच्या स्वतःच्या नागपूर शहरातील 6 चार्जिंग स्टेशन्सचा समावेश आहे, याशिवाय नागपूर जिल्ह्यातील 53 आणि वर्धा जिल्ह्यातील 6 खासगी चार्जिंग स्टेशन्सचा समावेश आहे. या स्टेशन्सवर चार्जिंग करणाऱ्या वाहनांची संख्या सातत्याने वाढत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com