संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 29 :- कळमना रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या महारेल च्या कामावर कंत्राटी पद्धतीने टँकर चालक म्हणून कार्यरत असलेल्या तरुणाच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात कारचालकाने दिलेल्या जोरदार धडकेत घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना आज दुपारी 3 दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव रामलाल भगतजुगणु परते वय 35 वर्षे रा जिरीया मंडला मध्यप्रदेश असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा महारेल च्या कामावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत असून आज कामठी चा शुक्रवारी बाजार असल्याने नवीन कपडे विकत घेण्याच्या उद्देशाने कामावरून वेळेतून वेळ काढुन सहकारी कर्मचाऱ्याची दुचाकी क्र एम एच 40 ए जे 9464 ने कामठी कडे जात असता रणाळा मार्गवरील मोरबी टाईल्स समोर कामठी हुन नागपूरकडे भरधाव वेगाने जात असलेल्या अज्ञात करचालकाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.पोलिसांनी घटनेची नोंद करीत अज्ञात काचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे तर मृतक हा विवाहित असून याच्या पाठीमागे वडील,एक लहान भाऊ, पत्नी तसेच तीन मुले व एक मुलगी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.