नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवामध्ये यंदा तीन नवीन पुरस्कार देण्यात येणार आहेत. उद्या रविवार 28 जानेवारी रोजी यशवंत स्टेडियम येथे सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या समारोपीय समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. उत्कृष्ट संघटना, उत्कृष्ट संघटक आणि उत्कृष्ट प्रशिक्षक अशा तिनही पुरस्कार्थींचे नाव खासदार क्रीडा महोत्सव समितीद्वारे शनिवारी (ता.27) जाहीर करण्यात आले आहेत.
खासदार क्रीडा महोत्सवाद्वारे यंदा देण्यात येत असलेला उत्कृष्ट संघटना पुरस्कार कॉटन मार्केट येथील सुभाष क्रीडा मंडळाला जाहीर करण्यात आलेला आहे. स्मृतीचिन्ह व 1 लाख रुपये रोख असे उत्कृष्ट संघटना या पुरस्काराचे स्वरूप आहे. हरेश व्होरा यांची उत्कृष्ट संघटक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तर गणेश पुरोहित यांची उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. स्मृतीचिन्ह व प्रत्येकी 51 हजार रुपये रोख असे उत्कृष्ट संघटक आणि उत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्काराचे स्वरूप आहे. खासदार क्रीडा महोत्सव समितीद्वारे तिनही पुरस्कार्थींची निवड करण्यात आली आहे.
समितीकडे आलेल्या अर्जांमधून क्रीडा भूषण पुरस्कार्थींची देखील निवड करण्यात आलेली आहे. या सर्व पुरस्कार्थींना उद्या रविवारी यशवंत स्टेडियमवर सायंकाळी 6 वाजता आयोजित समारंभामध्ये खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील.