– ३१ मार्चपर्यंत शास्तीत २५ टक्के सवलत
चंद्रपूर :- मालमत्ता व पाणीकराची करवसुली मोठ्या प्रमाणात थकीत असल्याने मनपातर्फे करवसुली मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. कर वसुलीसाठी मनपाद्वारे १४ पथके ॲक्शन मोडवर कार्य करीत असुन पथकांद्वारे गौतम नगर येथील ४ नळधारकांची नळ जोडणी खंडित करण्यात आली आहे.
मनपाचे ५१ अधिकारी – कर्मचारी यांची पथके कर वसुलीत सातत्याने कार्यरत असुन थकबाकी वसुली तसेच थकबाकी न भरल्यास नळ जोडणी कपात करण्याची कारवाई केली जात आहे. गौतम नगर येथील नानाजी वैरागडे,जोगेश्वरी पेरगे, पोचूराम वैरागडे,पेंटाजी दहागावकर या ४ मालमत्ताधारकांवर मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. वारंवार वसुली पथकाद्वारे पाठपुरावा केल्यानंतरही सदर मालमत्ताधारकांनी कराचा भरणा न केल्याने कारवाई करण्यात आली आहे.
इतर काही थकबाकीदारांद्वारे रोख,धनादेश अथवा ऑनलाईन पद्धतीने कराचा भरणा केला जात असुन काही थकबाकीदारांनी ठराविक मुदतीत कर भरण्याचे मान्य केले आहे. ज्यांनी मुदत मागितली आहे त्यांची नोंद ठेवण्यात आली असुन वेळेवर करभरणा न झाल्यास नळ जोडणी खंडीत करण्याची कारवाई केली जाणार आहे.
असा करावा भरणा – www.cmcchandrapur.com या लिंकवर Pay Water Tax Online या टॅबवर पाणीपट्टी कराचा तर https://chandrapurmc.org या लिंकवर मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करता येणे शक्य आहे. त्याचप्रमाणे फोन पे, गुगल पे,भीम या युपीआय ॲपवर सुद्धा मालमता व पाणी कराचा भरणा करता येणे शक्य आहे.मनपाच्या झोन कार्यालयांमध्ये प्रत्यक्षरीत्या कराचा भरणा करता येईल. तसेच व्हॉट्सॲप चॅटबॉटचा वापर करून सुद्धा मालमत्ता कर भरता येणार असुन याकरिता 8530006063 या क्रमांकावर वर “hi” टाईप करून आलेल्या उत्तरात ४ था क्रमांकाचा पर्याय निवडुन कर भरता येईल.
शास्तीत सवलत – मनपातर्फे ०१ फेब्रुवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत थकबाकीसह मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकास शास्तीत २५ टक्के सवलत देण्यात येत आहे.