विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रक्रियेचा भाग व्हावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

– सरळ सेवेद्वारे नियुक्त कनिष्ठ अभियंत्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण

मुंबई :- सार्वजनिक बांधकाम विभागात परंपरागत सुरु असलेल्या कामांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत, चिरकाल टिकणारे नाविण्यपूर्ण काम करून विभागाची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रक्रियेचा भाग होण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण यांनी केले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने सरळ सेवेद्वारे नियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री श्री. चव्हाण बोलत होते. सरळ सेवेद्वारे नियुक्त 529 कनिष्ठ अभियंत्यांना (स्थापत्य) संपूर्ण राज्यभर नियुक्तीपत्र वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 27 जणांना प्रातिनिधिक स्वरूपात मंत्री चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले.

मंत्री चव्हाण म्हणाले की, नवनियुक्त उमेदवारांनी सकारात्मक विचार, आत्मविश्वासाने देशाला आणि राज्याला नवी दिशा देणारे काम करावे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नव्या उमेदीच्या तरूणांना या प्रक्रियेत सहभागी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची राज्य शासनाने अंमलबजावणी करत भरती प्रक्रिया मोहीम तातडीने व पारदर्शक पद्धतीने राबविली. ७८ हजार उमेदवारांपैकी ५२९ उमेदवारांची नियुक्ती केली आहे.

विकासासाठीचा पारदर्शक कारभार आणि देशाची महासत्तेकडे जाणारी ही वाटचाल असून यामध्ये यशस्वीपणे कार्य कराल, असा विश्वास मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला. २०४७ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होणार असून अमृतमहोत्सवी काळात शासनाचा भाग होत आहात ही अभिमानाची बाब आहे. देश विकसित करण्याच्या प्रक्रियेत आपला सहभाग महत्वाचा आहे, असे सांगून त्यांनी अभियंत्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर म्हणाल्या की, भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांचा वारसा लाभलेल्या विभागाचा भाग बनून तुम्ही विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यात योगदान देऊ शकता. गुणवत्तेनुसार ही निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. टीसीएस संस्थेने परीक्षा आणि निकाल लावल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढील प्रक्रिया अतिशय गतीने आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करून आठ आठवड्यातच नियुक्तीपत्र प्रदान केले आहे. या विभागाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी नवनियुक्त अभियंत्यांचा सहभाग महत्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) संजय दशपुते, वास्तुविशारद रणजित हांडे, सरळ सेवाद्वारे नियुक्त उमेदवार व त्यांचे पालक यावेळी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्र शासनाचे १३ वर्षे मुदतीचे ३ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

Fri Mar 15 , 2024
मुंबई :- महाराष्ट्र शासनाच्या १३ वर्षे मुदतीच्या ३ हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री २० मार्च २०२४ रोजी अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे. अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com