बा … !  बाबासाहेबांचा

स्पर्शबंदी, स्वप्नबंदी सोबत सोबत होत्या. एकीसोबत दुसरीही येत होती. एक अस्पृश्यता होती. दुसरी स्वप्नहन्ता. एक दृश्य होती. दुसरीत अदृश्यता. दोन्ही जुळून होत्या. जीवनघेण्या. पिढीगारदी.

अशा या गारदीयुगात, बंदीकुळातील बापाने स्वप्न पाहिणे. हीच मोठी प्रारंभिका म्हणावी. युगप्रवर्तनाचा नंतर तो प्रारंभ ठरला !

ते प्रारंभपुरुष म्हणजे .. थोर रामजी आंबेडकर ! ते ते बा .. बाप .. होते. त्यांना जर पुढचे स्वप्न पडले नसते तर .. ! अंधारयुग काळोखात अधिक गडद झाले असते !

त्यांनाही हे ठाऊक नव्हते, हे स्वप्न नवा सूर्य असेल. ते केवळ करीत गेले. अथक करते राहिले. करता करताच गेले. पूर्णोदय ते पाहू शकले नाहीत. पहाटेचे दर्शन तेव्हढे त्यांना झाले होते.

रामजी सैन्यात सूभेदार होते. अफगाणिस्तान रणांगणात ते लढले. सेनेच्या नाॅर्मल स्कुलचे ते प्राचार्य होते. सलग चवदा वर्षे होते. पदोन्नतीला ही मोठी जोड होती.

ते उत्तम शिक्षक होते. ते शिक्षक घडवीत. आवाज खणखणीत होता. त्यांना गणित आवडे. इंग्रजीवर पकड होती. इंग्रजीत लिहित बोलत. तर्खडकर भाषांतर पाठमालेच्या ते विशेष प्रेमात असत.

ते देखणे होते. धिप्पाड होते. गौरवर्णी होते. आध्यात्मिक होते. निर्व्यसनी होते. वादपटू होते. तर्कशीलतेवर भर देत असत. ते खूप खेळत. क्रिकेट आवडे.

बाबासाहेब तीन वर्षाचे असतांना रामजी निवृत्त झाले. तेव्हा ते महू छावणीत होते. तिथेच बाबासाहेबांचा १८९१ ला जन्म झाला. बाबासाहेब चवदावे अपत्य होते. शेवटचे.

घरात, जगलेली सात मुलें (बाळाराम, गंगा, रमाबाई, आनंदराव, मंजुळा, तुळसा व भीमराव (भिवा) ), पत्नी भीमाबाई अन् थोरली बहीण मीरा अशी मंडळी रहायची. मीरा पायाने पांगळ्या होत्या.

मुलींची वेळच्यावेळी लग्ने झाली. मुले शिकायला घातली. बाबासाहेब लहानपणी हूड होते. अभ्यास निकालात सामान्य असत. सवंगडीखोर होते. भांडणे घरापर्यंत यायची.

रामजी आडनावाने सकपाळ होते. नंतर ते मुलासोबत आंबेडकर झाले. रामजीचे वडील, वडीलाचे वडील सेनेतच होते. सासरची मुरबाडकर मंडळीही सेनेत होती. ही मंडळी धनी होती.

दोन्ही वंशावळीत सेनेतील शिक्षकी पेशात मात्र, रामजी हे एकमेव होते.निवृत्तीपर्यंत रामजींजे आयुष्य पलटणमय राहिले. नंतर काहीसे अस्थिर झाले. आता ते पेन्शनधारक होते. दापोली, सातारा, मुंबई असा प्रवास झाला. चांगले वाईट घडत गेले.

निवृत्तीच्या सहा वर्षांनंतर पत्नी भीमाबाई यांचे निधन झाले. मुलांचा सांभाळ करायला रामजींनी जिजाबाई या विधवेशी पुनर्विवाह केला. आता कायमची मुंबई असा रामजींचा प्रवास सुरू होता.

तत्कालीन महत्वाच्या लोकांशी रामजींनी संवाद संबंध राखले होते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, न्या रानडे यांचेशी त्यांची बऱ्यापैकी ओळख होती. प्राचार्य कृष्णाजी केळुसकर गुरुजी हे मित्र होते. ज्ञाती पंचायतीत ते निर्णायक हिस्सा असत. वसाहतीतील सर्व कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असे.

तेव्हा शिक्षणाचे महत्त्व, इंग्रजीची महत्ता अस्पृश्यात क्वचित कुणी सांगत असत. अवांतर वाचनाचे मोल, मुलांच्या शिक्षणाचा ध्यास दूर दूर होते.

तेव्हा ती महत्वता रामजींना कळाली होती.

बाबासाहेब हयात असतांना, आचार्य अत्रे यांनी बाबासाहेबांच्या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त नवयुगचा ‘आंबेडकर विशेषांक ‘ काढला. त्यात बाबासाहेबांची संवादात्मक मुलाखत छापून आली. तीत वडीलांविषयी बाबासाहेब म्हणतात, आमच्या वडीलांची घरची शिस्त, कडक व फौजी असल्यामुळे मला त्यांच्या कडकपणाचा फार कंटाळा येई. आता मला वाईट वाटते की माझ्या वडीलांच्या तळमळीप्रमाणे मी अभ्यास केला असता, तर मला मुंबई विश्वविद्यालयातील एकूण एक परीक्षेत दुसरा वर्ग तरी मिळविणे काही अशक्य झाले नसते. पण त्यावेळी मला त्यांच्या तळमळीचा अर्थ कळत नसे.

मी उत्तम तऱ्हेने पास व्हावे याविषयी त्यांनी माझी किती काळजी वाहिली असेल याची कोणाला कल्पना सुध्दा यायची नाही.

माझ्या वडीलांना थोडेसे पेन्शन मिळत असे. पण मुंबईची राहणी व कुटुंबात बरीच माणसें सांभाळायची त्यामुळे मला लागतील ती पुस्तके आणून देणे व मला चांगले कपडेलत्ते करून देणे हे वडीलांच्या आटोक्याबाहेरचे असे. तरीपण होईल ती झीज सोसून ते माझ्या सुखसोयीची तरतूद करीत. असा प्रेमळ पिता फार थोड्यांना लाभत असेल.

पुढे बाबासाहेब म्हणतात, मराठीप्रमाणेच त्यांना इंग्रजी भाषेचा पण अभिमान होता. त्यांना इंग्रजी शिकविण्याची भारी हौस होती. ते मला नेहमी सांगत,

‘हावर्डची पुस्तकं तोंडपाठ करुन टाक !’. तर्खडकरांची भाषांतर पाठमालेची तीन पुस्तके पण त्यांनी माझ्याकडून पाठ करवून घेतली होती. मराठी भाषेतील शब्दांना योग्य इंग्रजी प्रतिशब्द हुडकून काढण्यास व त्यांचा योग्य ठिकाणी उपयोग करण्यासही माझ्या वडीलांनीच मला शिकविले. त्याचप्रमाणे इंग्रजी वाक्प्रचार (Idiom) व योग्य भाषाशैली कशी वापरावी, हेही त्यांनीच मला शिकविले.

माझ्या वडीलांनी मला जसे शिकविले तसे इतर कोणाही मास्तरांनी मला शिकविले नाही !

मी एखादे पुस्तक मागितले की ते संध्याकाळपर्यंत माझ्या वडीलांनी कोठून तरी आणून दिले नाही असे कधी झालेच नाही. खिशात पैसे असोत नसोत, बहुतेक खिशात पैसे नसायचेच, खाकोटीस आपले नेहमीचे मुंडासे मारुन स्वारी बाहेर पडायची.

त्यावेळी माझ्या दोघीही वडील बहिणी येथेच मुंबईत असायच्या. त्यांची लग्ने झालेली होती. माझे वडील धाकट्या बहिणीकडे जायचे व तिच्यापाशी जे काही तीन-चार रुपये माझ्या पुस्तकासाठी मागायचे. तिच्यापाशी तरी कोठून असणार ? बिचारी कळवळ्याने, ‘माझ्यापाशी एवढे रुपये नाहीत’ असे म्हणायची.

मग लगेच माझे वडील पुन्हा आपले मुंडासे खाकोटीस मारुन माझ्या थोरल्या बहिणीकडे जायचे. तिच्यापाशीही सुटे रुपये नसले म्हणजे ते तिच्याकडून एखादा दागिना मागून घेत असत. तो दागिना घेऊन ते एका ठराविक मारवाड्याकडे जात. त्याच्याकडे महिन्यासाठी तो दागिना गहाण ठेवीत. महिना संपला की पेन्शन हाती पडल्याबरोबर वडील पुन्हा त्या मारवाड्याच्या घरी जात व तो गहाण ठेवलेला दागिना सोडवून आणून बहिणीला पोचता करीत.

मी बी ए व्हावे याबद्दल वडीलांना अत्यंत तळमळ वाटत असे. परीक्षेच्या वेळी मी पहाटे दोन वाजता जागे व्हावे म्हणून वडील दोन वाजेपर्यंत निजतच नसत.

शेवटचा प्रसंग सांगतांना बाबासाहेब म्हणतात, बी ए पास झाल्यावर माझ्या वडीलांना वाटले मी इथेच रहावे. बडोद्याला जाऊ नये. बडोद्याला गेल्यानंतर माझा जो अपमान होणार होता त्याची कल्पना वडीलांना आधीपासून होती असे वाटते.‌

बडोद्यास गेल्यानंतर अकरा दिवसांच्या आतच त्यांचा मुंबईस अंत झाला. ते एकाएक आजारी पडल्याची मला तार आली. मी बडोद्याहून मुंबईस पोचण्यासाठी निघालो. सुरत स्टेशनवर वडिलांसाठी सुरतची बर्फी घ्यावी. वडीलांना बरे वाटेल असे वाटले. बर्फी घ्यायच्या गडबडीत गाडी सुटली. तेव्हा दुसरी गाडी सुरतेहून निघेपर्यंत वाट पाहण्याशिवाय मला गत्यंतर नव्हते.

त्यामुळे दुसरे दिवशी दुपारी फार उशीरा मुंबईस पोहचलो.‌ घरी येऊन पाहतो तो वडीलांची प्रकृती अत्यवस्थ झालेली दिसली. सारी मंडळी त्यांच्या अंथरुणाशेजारी चिंतातुर होऊन बसलेली. ते दृश्य पाहताच माझ्या काळजात चर्र झाले.

वडीलांनी माझ्या अंगावरून प्रेमाने हात फिरविला. मला एकदा पूर्णपणे डोळे भरून पाहून त्यांनी आपला प्राण सोडला. केवळ माझ्या भेटीसाठीच त्यांचे प्राण एकसारखे घुटमळत होते.

सुरतेला उतरल्यामुळे त्यांना लवकर भेटता आले नाही याबद्दल मला अतिशय पश्चात्ताप वाटला !

असा हा बा .., बाप .. होता !

बाबांच्या उत्तुंगतेच्या पायथ्याचे माप होता !

 – रणजित मेश्राम

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जलपर्णी काढण्यासाठी सरसावले शेकडो हात

Mon Jun 17 , 2024
– जनसहभागातून जलपर्णी काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू – अंबाझरी तलाव स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद नागपूर :- शहरातील प्रसिद्ध अंबाझरी तलावात दिवसेंदिवस वाढत असलेली जलपर्णी जनसहभागातून काढण्याचा महत्वाकांक्षी निर्णय नागपूर महानगरपालिकेने घेतला आहे. या निर्णयाला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवित स्वयंस्फूर्तीने पुढे येत श्रमदान केले. रविवारी 16 जून रोजी सकाळी अंबाझरी तलावातून जलपर्णी काढण्याकरिता शेकडो हात सरसावल्याचे दिसून आले. ही मोहीम पुढील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!