मुंबई :- आज मुंबईत संपन्न होत असलेल्या 18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उद्घाटन समारंभात, प्रख्यात पुरस्कार विजेते वन्यजीव चित्रपटकार सुब्बय्या नल्लामुत्थू यांना यावर्षीचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि महाराष्ट्राचे संस्कृती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
माहितीपट आणि भारतामधील ही चळवळ यामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या चित्रपट निर्मात्याला मिफ्फच्या प्रत्येक आवृत्तीमध्ये जीवनगौरवर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. 10 लाख रुपये रोख, ट्रॉफी आणि एक स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
1950 च्या दशकात मानद मुख्य निर्माते म्हणून फिल्म्स डिव्हिजनसोबत अतिशय घनिष्ठ संबंध असलेले महान चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार नेहमी पाठीशी असलेल्या आपल्या माता-पित्यांना समर्पित करत असल्याचे सुब्बय्या नल्लामुत्थू यांनी सांगितले.
“यावर्षीच्या महोत्सवात हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जिंकल्याबद्दल मी नल्लामुथू यांचे अभिनंदन करतो”, असे मुरुगन यांनी एनएफडीसी संकुलात माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. वन्यजीव चित्रपट निर्मिती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार सुब्बिया नल्लामुथु यांना मिफ्फ मध्ये दिला गेला.