मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच शिवसेना – भाजपा सोबत सरकारमध्ये सामील झाल्याने आता महाविकास आघाडी पूर्णपणे नामशेष झाली आहे अशी टीका भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी सोमवारी केली .भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश प्रवक्ते अभिषेक मिश्रा,ओमप्रकाश चौहान उपस्थित होते. अजित पवार आणि त्यांच्या सहका-यांच्या शपथविधीवर खा. संजय राऊत आणि दै. सामना कडून करण्यात आलेल्या टीकेचा आ. राणे यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला.
आ. राणे म्हणाले की, २०१९ साली जनमताचा अपमान करत मुख्यमंत्रीपदाच्या लालसेने उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीला दगा देऊन राजकारणाचा चिखल केला होता. तेच आज उच्चरवात भारतीय जनता पार्टीवर टीका करत अकलेचे तारे तोडत आहेत हे हास्यस्पद आहे. तुम्ही जे २०१९ साली केले तो महाराष्ट्र धर्म होता ,मात्र आम्ही जे केले तो महाराष्ट्र द्रोह असे बोलण्यास जीभ धजावते कशी असा सवाल त्यांनी केला.
तीन पक्षांची महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून संजय राऊत यांच्याकडून व दै.सामना मधून सातत्याने अजित पवार यांच्यावर टीका करण्यात येत होती. शरद पवार यांचे घर फोडण्याचा एक कलमी कार्यक्रम संजय राऊत यांनी हाती घेतला होता. राऊत यांच्या घाणेरड्या राजकारणामुळेच महाराष्ट्रात ही स्थिती उद्भवली. अजित पवारांच्या शपथविधीनंतर समाधान मिळाल्याने राऊत यांचा आत्मा शांत झाला असावा, अशी घणाघाती टीका आ. राणे यांनी केली.पवारांनंतर आता संजय राऊत यांचे पुढचे लक्ष्य हे कॉंग्रेसमध्ये फूट पाडणे हे असल्यानेच सातत्याने नाना पटोले यांना लक्ष्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
तीन पक्षांच्या कुबड्यांवर उभ्या राहिलेल्या ‘मविआ’चे अस्तित्वच ख-या अर्थाने आता संपुष्टात आले असून लवकरच श्रद्धांजलीची तारीख सांगतो अशी खोचक टिप्पणी आ. राणे यांनी केली. भाजपावर टीकेची झोड उठवण्याआधी स्वत:च्या घरात काय सुरू आहे त्याची चिंता करा असा खोचक सल्ला आ. राणे यांनी खा. राऊत यांना दिला. राज्याचा आणि देशाचा विकास हा मोदी सरकार व भाजपाच करू शकेल या विश्वासापोटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपा बरोबर आला असेही ते म्हणाले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड न करताच आमच्या सरकारची वाटचाल भविष्यात चालू राहील असेही आ. राणे यांनी नमूद केले.