– भारतीय महसूल सेवेतील ‘सहायक आयुक्त’ या पदासाठी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी, नागपूर येथे दिल्या जाणाऱ्या ‘उत्तरायण-2023’ या प्रशिक्षणवर्गाचे उद्घाटन
नागपूर :- महसूल हा प्रशासनाचा कणा असून केंद्र सरकारसाठी महसूल जमा करण्याचे महत्त्वाचे कार्य हे आयकर विभागामार्फत केले जात असून कर चुकवेगिरीला आळा घालण्यासोबतच आयकर अधिकाऱ्यांनी करदात्यांना उत्तम सेवा देऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करावे, असे आवाहन राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या प्रमुख महासंचालिका वसुंधरा सिन्हा यांनी आज नागपूर येथे केले. आयकर अधिका-यांमधून नव्याने बढती मिळणा-या अधिका-यांना भारतीय महसूल सेवेतील ‘सहायक आयुक्त’ या पदासाठी व कर प्रशासनाच्या व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी, नागपूर येथे दिल्या जाणाऱ्या ‘उत्तरायण-2023’ या प्रशिक्षणवर्गाचे उद्घाटन आज राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी येथे वसुंधरा सिन्हा यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी मध्ये 7 आठवड्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान नव्याने पदोन्नत झालेल्या या सहाय्यक आयकर आयुक्तांना आंतरराष्ट्रीय कर प्रणाली, ट्रान्सफर प्राईसिंग, डिजिटल फॉरेन्सिक्स ,अशा विविध पैलूंचे प्रशिक्षण दिले जाते.
याप्रसंगी नव्याने पदोन्नत झालेल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सिन्हा यांनी सांगितले की या पदोन्नतीमुळे एक स्वभावात्मक परिवर्तन तुमच्यामध्ये घडून येईल. नव्याने आलेल्या जबाबदारीला योग्यरीत्या पार पाडण्यासाठी संवाद कौशल्य, नेतृत्व क्षमता, वेळ व्यवस्थापन हे आत्मसात करणे आवश्यक आहे. आयकर विभागात ई-फायलिंग, फेसलेस असेसमेंट यासारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे घडवून आलेले बदल चांगल्या रीतीने राबविण्याकरिता अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी मध्ये असलेल्या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम, डिजिटल फॉरेन्सिक्स , सायबर लॉ या प्रशिक्षण अभ्यासक्रम यशस्वीरित्या पुर्ण करणे आवश्यक आहे. येथील अधिकाऱ्यांपैकी बहुतांश अधिकाऱ्यांना 15 वर्षापेक्षा जास्त अनुभव हा प्रत्यक्ष कर्तव्यावरील आहे त्यामुळे नव्याने झालेले विभागातील बदल याबद्दल माहिती घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे, असे देखील त्यांनी सांगितले.
आयकर विभागाची देशाच्या अर्थव्यवस्थेत असणारी महत्त्वाची भूमिका स्पष्ट करताना सिन्हा यांनी सांगितलं की, गेल्या 10 वर्षांमध्ये एकूण प्रत्यक्ष कर संकलन हे 172 टक्क्यांनी वाढले असून 2022-23 या आर्थिक वर्षात ते 9 लाख 68 हजार कोटी वर पोहोचले आहे.
उत्तरायण 2023 या प्रशिक्षण कार्याक्रमामध्ये एकूण 101 प्रशिक्षणार्थी अधिकारी असून यापैकी 13 अधिकारी या महिला आहेत. सर्वाधिक प्रशिक्षणार्थी अधिकारी हे महाराष्ट्रामधील असून त्यानंतर बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यातील अधिकाऱ्यांची संख्या जास्त आहे . यापैकी 24 अधिकारी वाणिज्य शाखेचे पदवीधर असून 19 अधिकारी विज्ञान शाखेचे तर 12 अधिकारी हे कला शाखेचे पदवीधर आहेत. या अधिकाऱ्यांपैकी 8 अधिकाऱ्यांना अभियांत्रिकी तर 5 अधिकाऱ्यांना व्यवस्थापन आणि सनदी लेखापाल अभ्यासक्रमाची शैक्षणिक पार्श्वभूमी आहे. उत्तरायण प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी अधिकाऱ्यांना कर-प्रशासनाची शपथ अतिरिक्त महासंचालक मनीष कुमार यांनी दिली.