– जिल्हास्तरीय कृषी व पशु प्रदर्शनी चे सावनेर येथे उद्घाटन
सावनेर :- आज निसर्गाच्या कोपामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कधी दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस,कधी अतिवृष्टी तर कधी कधी गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकाचे संपूर्ण नुकसान होत असते. आपल संपूर्ण वर्षांची मेहनत करून शेतकरी राजाला नैसर्गिक आपत्ती मुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागते. परंतु शेतकऱ्यांनी शेती पाठोपाठ जर पशुपालन हा जोडधंदा स्वीकारला तर मोठ्या प्रमाणात शेतकरी आर्थिकदृष्टीने सक्षम होऊ शकते असे वक्तव्य राज्याचे माजी मंत्री व आमदार सुनील केदार यांनी केले.
नागपूर जिल्हा परिषद व पशुसंवर्धन विभागाचे वतीने बाजार समिती सावनेर येथे आयोजित जिल्हास्तरीय कृषी व पशु प्रदर्शनी कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार सुनील केदार यांचे हस्ते प्रदर्शनीचे विधिवत उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख रूपाने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोक्कड्डे, उपाध्यक्ष कुंदा राऊत, पदवीधर विभागाचे आमदार अभिजित वंजारी, शिक्षक आमदार सुधाकर आडबैले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा परिषद सभापती अवंतिका लेकुरवाळे, राजू कुसुम्बे, बाळू जोध, मिलिंद सुटे, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती उपसभापती,सदस्य ,बाजार समितीचे सभापती,सदस्य व मोठ्या प्रमाणात पशुपालक शेतकरी व नागरिक उपस्थित होते.
आपल्या उद्घाटनिय वक्तव्यात सुनील केदार यांनी अनेक मुद्द्यांविषयी वाच्यता केली. महाविकास आघाडी शासनात मंत्री पशुसंवर्धन विभागाचा मंत्री असतांना नागपूर जिल्ह्यात पशु वाटपाचा पायलट प्रोजेक्ट सुरू केला व त्याला यश सुद्धा मिळाले. ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. परंतु आता सदर योजनेला शासनाकडून कोणतेही अर्थसहाय्य मिळत नसल्याचे वक्तव्य सुनील केदार यांनी केले.
पशुधन ही शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टया सक्षम बनविण्यास मदत करत असते. शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय या संकल्पना शेतकऱ्यांना अधिक मोठ्या प्रमाणात उन्नत करत असल्याचे वक्तव्य सुनील केदार यांनी केले.
येत्या काळात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनि मोठ्या प्रमाणात पशुसंवर्धन व त्यावर आधारित उद्योगाप्रति आकर्षित व्हावे याकरिता अश्या प्रदर्शनी मोलाच्या ठरतील अशे वक्तव्य सुनील केदार यांनी केले.