मुंबई :- मराठा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी झगडणा-या अखिल भारतीय मराठा महासंघाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आ.आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी ही घोषणा केली. महायुतीचे समन्वयक आ. प्रसाद लाड,
भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, मराठा महासंघाचे पदाधिकारी राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष ननावटे,संभाजी दहातोंडे, राज्य संपर्कप्रमुख अनिल ताडगे, महेश सावंत, अविनाश राणे, परशुराम कासुळे आदी यावेळी उपस्थित होते.
आ.शेलार यावेळी म्हणाले की, मराठा समाज बांधवांची आरक्षणाच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार व महाराष्ट्रात महायुती सरकार कटीबद्ध आहे. आरक्षणाच्या मागणी संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी सविस्तर चर्चा याआधीच झाली असून पुन्हा या आठवड्यात चर्चा करून स्पष्टता आणू असेही ते म्हणाले.
अ.भा.मराठा महासंघ अध्यक्ष दिलीप जगताप म्हणाले की आत्तापर्यंत सर्व निवडणुकांमध्ये महासंघाने भाजपाला पाठिंबा दिला आहे. जेव्हा जेव्हा आम्ही पाठिंबा दिला तेव्हा भाजपाला विजय मिळाला आहे. यंदाही भाजपा विजयी होईल. मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्राच्या सहकार्याने सोडवण्याचा विश्वास वाटल्याने भाजपाला पाठिंबा देत असून आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी भूमिका जगताप यांनी मांडली.