नागपूर :- आदिवासी विकास विभाग अंतर्गत पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना करायच्या ऑनलाईन अर्जामधील वयाची मर्यादा तांत्रिक कारण लक्षात घेता आता 30 वर्षे करण्यात आली आहे. तांत्रिक अडचणीमुळे ज्यांना अर्ज करता आला नाही त्यांच्यासाठी वयोमर्यादा शिथील करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे आदिवासी विकास आयुक्तालयाने पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
आदिवासी विकास विभाग शासन निर्णय 15 मे 2023 अन्वये पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतंर्गत विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्याकरिता वयोमर्यादा 28 वरुन 30 वयोमर्यादा करण्यात आली आहे. त्यानुसार ऑनलाईन प्रणालीत आवश्यक ते बदल करुन सन 2022-23 करिता विद्यार्थ्यांना उक्त योजनेकरिता लाभ घेता आला आहे.
तथापि, तांत्रिक अडचणीमुळे सन 2023-24 करिता काही विद्यार्थ्यांना स्वयंम योजनेचा अर्ज भरता न आल्याचे वृत्त अमरावती विभागातील वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. त्या बातमीची दखल घेऊन महाआयटी लि. मुंबई यांनी ऑनलाईन प्रणालीतील संकेतस्थळावर योग्य तो बदल केला असल्याने पात्र विद्यार्थ्यांना स्वयंम योजनेकरिता अर्ज करण्यासाठी आदिवासी कल्याण विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.