मुंबई : शाळांची संचमान्यता ही विद्यार्थी संख्येवर आधारित असते. त्यामुळे एकूण विद्यार्थी आणि त्यासाठी आवश्यक शिक्षकांची संख्या लक्षात घेण्यात आली आहे. तरीही सध्याची रिक्त पदे लक्षात घेता शिक्षक पद भरतीची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली.
प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्य राजेश राठोड यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, राज्यात शिक्षक पद भरती करण्याबाबत कार्यवाही केली जात आहे. एकूण मान्यतेच्या 50 टक्के शिक्षक पद भरती केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक परीक्षा नुकत्याच पार पडल्या आहेत. शिक्षकभरती नंतर शिक्षकेतर भरतीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पदभरतीनंतर रिक्त पदांचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. तसेच शाळांमध्ये नियमित कामकाज सुरळीत होऊ शकेल आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
संच मान्यता ही विद्यार्थी संख्येवर आधारित असल्याने आधार जोडणीचे काम सुरू आहे. त्यानंतर विद्यार्थी संख्या कळू शकेल आणि शिक्षक अतिरिक्त ठरणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
यासंदर्भात झालेल्या चर्चेत सदस्य सुधाकर अडबाले, आमशा पाडवी, अभिजित वंजारी, जयंत पाटील, कपिल पाटील, अरुण लाड आदींनी सहभाग घेतला.