संचमान्यतेसाठी आधारकार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांनाही गृहित धरा – महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेची शिक्षणमंत्र्याकडे मागणी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- आधारकार्ड नसलेल्या तसेच आधारकार्ड आणि शाळेतील नोंदी यात विसंगती असलेल्या विद्यार्थ्यांना गृहीत धरुनच २०२२ -२३ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे केली आहे. शाळांमधील संचमान्यता अंतिम करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचे आधारकार्ड स्टुडंट पोर्टलवर लिंक असणे आवश्यक आहे. आशा विद्यार्थ्यांनाच संचमान्यतेत गृहित धरले जाणार आहे. मात्र या निर्णयामुळे विद्यार्थी संख्या कमी होऊन त्याचा फटका अनेक शिक्षकांना बसणार आहे. शिक्षकांची पदे अतिरिक्त ठरण्याची भिती आहे.

राज्यातील अनेक विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड आणि शाळेतील नोंद तपशिलात फरक आढळून आल्याने विद्यार्थ्यांची नोंदणी होवू शकली नाही. दुर्गम भागातील शाळांतील विद्यार्थी , भटक्या जाती-जमातीतील विद्यार्थी , पालकत्वासह अन्य कौटुंबिक समस्या यामुळे अनेक विद्यार्थ्यांची आधारकार्ड तयार होऊ शकलेली नाहीत. त्यातच अनेकांच्या बाबतीत आधारकार्ड तयार करण्यासाठी विद्यार्थ्याची कोणतीही माहिती नसल्यामुळे विद्यार्थ्यांची आधारकार्ड काढता येत नाहीत. काही विद्यार्थ्यांनी आधारकार्ड काढली आहेत , पण त्यांच्पा पालकांनी दिलेली माहिती व त्या विद्यार्थ्याची शाळेत असलेली माहिती यात विसंगती आढळल्या आहेत.

आधारकार्ड नसलेले किंवा त्यात चुका असलेले अनेक विद्यार्थी दररोज शाळेत येत आहेत. त्यामुळे संचमान्यतेत या विद्यार्थ्यांना गृहित धरणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र राज्य खाजगीाशिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे यांनी सांगितले. याविद्यार्थ्यांना गृहीत न धरल्यास संचमान्यता करताना शाळांमध्ये विद्यार्थी कमी दर्शवण्यात येतील. परिणामी शाळेत प्रत्यक्षात विद्यार्थी असतानाही त्या प्रमाणात शिक्षक उपलब्ध होणार नाहीत. म्हणुन आधारकार्ड नसलेल्या , आधारकार्ड नोंदित विसंगती असलेल्या विद्यार्थ्यांना गृहित धरुनच संचमान्यता करण्याची मागणी संघटनेकडून होत आहे.

निवेदन देताना महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे , राज्य सहसचिव महेश गिरी , नागपुर विभागाचे सचिव विजय आगरकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com