– डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आंदोलनाला यश
नागपूर :- अंबाझरी तलावालगतचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन राज्य शासन स्वत: बांधून देणार असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आंबेडकरी समाजबांधवांची निष्ठा आणि भावना जुळून असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची सन्मानपूर्वक पुनर्बांधणी करण्याचा शासनाचा हा निर्णय सामाजिक संवेदना दर्शविणारा असल्याचे सांगत भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल संपूर्ण समाजबांधवांच्या वतीने त्यांचे आभार मानले.
राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे कोणत्याही पूर्वसूचनेविना अंबाझरी तलावालगत असलेले ऐतिहासिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडण्यात आले होते. यानंतर आंबेडकरी समाजबांधवांमार्फत मागील २७२ दिवसांपासून सतत आंदोलन सुरू होते. बुधवारी (ता.१९) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनस्थळी भेट देउन शासनाद्वारे सांस्कृतिक भवनाचे बांधकाम करण्याची ग्वाही दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या पतनानंतर भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकरण पुढे आणले होते. त्यांनी सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास सदर विषय आणून देण्याचा प्रयत्न केला. त्याचेच फलीत यापूर्वी सांस्कृतिक भवनाच्या पतनानंतर त्या ठिकाणी सुरु असलेले काम तात्काळ बंद करून कामाला स्थगिती देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला दिले होते. यानंतर पुढचे पाउल उचलित त्यांनी शासनातर्फे भवनाची निर्मिती करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेत ख-या अर्थाने संपूर्ण प्रकरणाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन ही नागपूर शहरातील ऐतिहासिक वारसा असलेली वास्तू होती. बाबासाहेबांनी धम्म दीक्षा घेतल्यानंतर नागपूर महानगरपालिके द्वारे त्यांचा जाहीर नागरी सत्कार केला होता. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर महापालिकेने त्यांच्या स्मृतीमध्ये अंबाझरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन बांधले. या सांस्कृतिक भवनामध्ये अनेक महत्वाच्या बैठक, सभा झाल्या. एव्हाना मनपाच्या विविध विभागातील पदभरती संदर्भात मुलाखती देखील येथे झाल्याची आठवण यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी सांगितली.
सामाजिक संवेदना जपणा-या या नेत्याने सामाजिक जाणीव जपत नेहमीच या विषयाला प्राधान्य देत आवश्यक पाठपुरावा केला. समाजबांधवांचे हित आणि काळजीच्या दृष्टीने विषयाला न्याय मिळवून देण्यासाठी तत्परता दाखविली, असे नमूद करीत ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.