नागपूर :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल 28 फेब्रुवारी रोजी जाहीर करणात आला. त्यात महाज्योतीने अर्थसहाय्य दिलेल्या 131 विद्यार्थ्यांना विविध विभागात प्रशासकीय काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यातील 68 विद्यार्थी हे इतर मागास वर्ग, 11 विद्यार्थी विमुक्त जाती, भटक्या जमाती –ब वर्गातील 11 विद्यार्थी, भटक्या जमाती –क मधील 18 तर भटक्या जमाती –ड मधील 20 विद्यार्थ्यांचा तसेच विशेष मागास प्रवर्गातील 3 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एम.पी.एस.सी. राज्यसेवा परीक्षेच्या व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरिता एकरकमी अर्थसहाय्य करण्याची योजना राबविण्यात येते.
महाज्योतीने सन 2022-23 या आर्थिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एम.पी.एस.सी. व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरिता एकरकमी अर्थसहाय्य करण्याची योजना सुरु केली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 20 आक्टोबर रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली, त्याकरिता एकूण 439 उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी योजनेकरिता पात्र 437 विद्यार्थ्यांना एम.पी.एस.सी. राज्यसेवा परीक्षेच्या व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरिता अर्थसहाय्य करण्यात आले होते.