नागपुरात आदिवासी क्षेत्रबंधन मुक्ती दिनाचे आयोजन आज

– काँग्रेस नेते के. राजु, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार व माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची उपस्थिती

नागपुर :- सन १९३५ च्या काळात ‘ब्रिटिशांनी आदिवासींवर अन्याय करणारा ‘आदिवासी क्षेत्रबंधन कायदा’ देशात लागू केला होता. या कायद्याने देशातील लाखो आदिवासी आपल्या हक्कापासून अनेक वर्षे वंचित राहिले. पण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७६ मध्ये घटना दुरुस्ती करून १८ सप्टेंबर १९७६ रोजी क्षेत्रबंधन उठविले आणि देशातील आदिवासींच्या विकासाचा मार्ग मोकळा केला. हा कायदा रद्द करण्यासाठी ज्या समाजसुधारकांनी आणि विविध पदांवर असलेल्या मंडळींनी आपले योगदान दिले त्यासर्वांना प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आदिवासी समाजाकडून आज दिनांक (१८ सप्टेंबर रोजी) शहरातील रेशिमबाग परिसरात कविवर्य सुरेश भट सभागृहात आदिवासी क्षेत्र बंधन मुक्ती दिवस समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभास काँग्रेसचे वरिष्ठ नेते के. राजू, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, सुनील केदार, माजी मंत्री अँड शिवाजीराव मोघे यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय नेते उपस्थित राहणार आहे.

आदिवासी क्षेत्रबंधनाचा कायदा जो आदिवासींसाठी अतिशय जाचक, त्रासदायक भेदभाव तफावत आणि विषमता निर्माण करणारा होता. तो कायदा संपुष्टात आणण्यासाठी तत्कालीन अनेक आदिवासी सामाजिक संघटनांनी प्रचंड संघर्ष केला यात प्रामुख्याने महाराष्ट्र आदिवासी युवक सेवा संघ, पुसद व प्रदेश आदिवासी मंडळ, नागपूर या दोन आदिवासी सामाजिक संघटनेचा पुढाकार होता. या संघटनांचे तत्कालीन नेते समाजसुधारक कै. आमदार नारायणसिंह ऊईके, मंत्री कै.बाबुराव मडावी, कै. आमदार गोविंदराव बुचके, पद्मश्री रामसिंग भानावत, कै. खासदार भाऊसाहेब उर्फ देवराव पाटील, कै. बाबुराव डवले, कै. देवराव ढोले आणि महाराष्ट्र आदिवासी युवक सेवा संघाचे तत्कालीन अध्यक्ष अँड.शिवाजीराव मोघे यांनी तब्बल १९६६ ते १९७६ असा दहा वर्ष संघर्ष केला, या समाजसुधारकांबद्दल आणि आदिवासी समाजसुधारकांचे मागे खंबीरपणे उभे राहून घटना दुरुस्ती करून क्षेत्रबंधनाचा कायदा रद्द करणाऱ्या तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी, राष्ट्रपती स्व. फखरुद्दीन अली अहमद, मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक, कै. शंकरराव चव्हाण यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व याच बरोबर आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रांत नावलौकिक प्राप्त केलेल्या व प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा सत्कार आणि समारंभाचे आयोजन या कार्यक्रमा दरम्यान करण्यात आले आहे. तर महाराष्ट्र विधिमंडळाच्या विरोधी पक्षनेतेपदी ब्रह्मपुरीचे काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात येईल. हा सोहळा शहरातील रेशीम बाग परिसरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात आज सकाळी ११.३० वाजता सुरु होणार असून या सोहळ्याचे उद्घाटक काँग्रेस अनु. जाती – व अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय समन्वयक के. राजु असणार तर अध्यक्षस्थानी आदिवासी काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री अँड. शिवाजीराव मोघे उपस्थित राहतील अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

हा सोहळा आयोजित करण्याकरीता महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल (ऑफ्रोट), विदर्भ आदिवासी विद्यार्थी संघटना, नागपूर, आदिवासी विद्यार्थी संघ, विदर्भ, ट्रायबल डॉक्टर्स असोसिएशन, ट्रायबल ऑफिसर्स फोरम, नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशन, गोंडवाना सेना, नागपूर यांचा सहभाग असून सोहळ्याच्या मार्गदर्शक म्हणून राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुनील केदार असून स्वागत अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय आदिवासी काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी आहे. या सोहळ्यात विभागातील सर्व आदिवासी बंधू-भगिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘शिकेल त्याला रोजगार’ अशा शिक्षण व्यवस्थेची तयारी - उपमुख्यमंत्री

Mon Sep 18 , 2023
– कौशल्यप्राप्त मनुष्यबळ देशाच्या अर्थव्यवस्थेचे चालक बनतील – आयटीआय पदवीदान समारंभ               नागपूर :- उद्योग क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाच्या मागणीनुसार औद्योगिकरण व शिक्षण यांची सांगड घालून अभ्यासक्रमात केलेल्या बदलामुळे प्रशिक्षीत विद्यार्थ्यांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. शासनाद्वारे मोठ्या प्रमाणात उद्योगांशी सामंज्यस्य करार करून त्यांच्याकरिता कुशल मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे. त्यामुळे जो शिकेल, त्याला रोजगार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com