समृद्धी महामार्गावरील अपघातांचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

– देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात जखमींची विचारपूस

बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरक्षित होण्यासाठी तज्ज्ञांमार्फत अभ्यास करण्यात येईल. त्यांच्या सूचनांनुसार उपाययोजना प्राधान्याने अंमलात आणण्यात येतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गावरील देऊळगाव राजानजीक खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचा शुक्रवारी (३० जून) रात्री दोन वाजता अपघात झाला. या अपघातात 26 जणांचा मृत्यू, तर आठ जण जखमी झाले आहेत. या अपघातस्थळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत आज दुपारी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन, रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर, आकाश फुंडकर, श्वेता महाले, विभागीय आयुक्त निधी पांडेय, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, पोलीस अधीक्षक सुनील कडासने आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, समृद्धी मार्गावरील अपघात हा दुर्दैवी आहे. समृद्धी महामार्गावरील अपघात अतिवेग आणि चालकांना झोपेची डुलकी आदी कारणांमुळे घडतात. असे अपघात घडू नयेत म्हणून दक्षता घेणे गरजेचे आहे. अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपायोजना शासन स्तरावरून गांभीर्यपूर्वक व प्राधान्याने करण्यात येतील.

अपघाताच्या पार्श्वभूमीवर स्थानिक यंत्रणा तातडीने अपघातस्थळी पोचली. बसचा मुख्य दरवाजा बंद असल्यामुळे प्रवाशांना बाहेर येता आले नाही. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ झाली. खासगी बसमध्ये जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.

समृद्धी महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी यंत्रणा कार्यान्वित आहे. महामार्गावर प्रवेश देण्याआधी वाहनांची तपासणी केली जाते. तसेच वाहनचालकाचे समुपदेशन केले जाते. वाहन किंवा वाहनचालक योग्य पात्रतेचे नसल्यास त्यांना परत पाठवले जाते. यामुळे प्रवाशांची आणि वाहन चालकांची नाराजी होते. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नियमांचे काटेकोर पालन करून वाहतूक नियंत्रण केले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

अपघातस्थळाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आठ जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. तसेच जखमींवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Sat Jul 1 , 2023
– विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर :- माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. उपायुक्त (सामान्य प्रशासन) प्रदिप कुळकणी यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आयुक्त कार्यालयातील अधिकारी शंकर बळी, अमित हाडके तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी यांनीही वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. विधानभवन परिसर विधानभवन परिसरात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!