-पर्यटक, इतिहासप्रेमींसाठी आगळा उपक्रम
– भ्रमणध्वनीवर वाचता आणि ऐकताही येते
– विद्यार्थी आणि युवकांत उत्सुकता
नागपूर :- ‘मी अजब बंगला बोलतोय्, नमस्कार, या वास्तूत आपले स्वागत आहे,’ असे वाक्य पर्यटकांच्या कानी पडते. एवढेच काय तर ही वास्तू अॅपद्वारे पर्यटकाचे नाव घेऊनच संवाद साधते. पडलात ना बुचकळ्यात, परंतु डिजिटलायझेशनमुळे हे शक्य झाले आहे. ‘अजब बंगला’ नावाने अॅप तयार करण्यात आले आहे. पर्यटकांनी अॅप डाऊनलोड करताच इत्थंभूत माहिती ऐकता येते आणि भ्रमणध्वनीवर वाचताही येते.
ही अभिनव कल्पकता मध्यवर्ती संग्रहालयाच्या अभिरक्षक जया वाहाणे यांची असून, प्राध्यापक सारंग धोटे यांनी अॅप तयार केले आहे. यासाठी वाहाणे यांनी संग्रहालयातील प्रत्येक दालनाची माहिती संकलित केली. संग्रहालयाचे डिजिटलायझेशन झाल्याने पर्यटक, अभ्यासक आणि इतिहासप्रेमींच्या संख्येत वाढ होत आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी आणि युवकांत याबद्दल उत्सुकता आहे.
उपराजधानीच्या शहरात ब्रिटिशांच्या काळातील देखणी वास्तू म्हणजे अजब बंगला. या ऐतिहासिक वास्तूत अजब वस्तूंची गजब दुनिया आहे. येथील अद्भुत विश्व पाहण्यासाठी पर्यटक, अभ्यासक, इतिहासप्रेमी आणि संशोधक येतात. संपूर्ण अजब बंगला पाहण्यासाठी दिवस लागतो. आता हे संग्रहालयदेखील डिजिटल झाले असून, गजब दुनियेची कमी वेळेत अधिक माहिती मिळते.
या ठिकाणचे निसर्ग दालन, प्राणी, पक्षिदालन, चित्र, हस्तशिल्प, पाषाण शिल्प, शस्त्र, पुरातत्त्व, आदिवासी संस्कृती, नागपूर वारसा दालन आणि शिलालेख दालन डिजिटलाईझ झाले आहे. सहायक अभिरक्षक विनायक निट्टूरकर संग्रहालयात येणार्यांना अॅपविषयी माहिती देतात. सिंदखेडराजा येथील संग्रहालयाचेही डिजिटलायझेशन झाले आहे.
क्यूआर कोडचा असा वापर
ऐतिहासिक वास्तूत प्रवेश करणार्या पर्यटकांना प्रथम अॅप डाऊनलोड करून घ्यावा लागतो. आत प्रवेश केल्यानंतर दालनातील क्यूआर कोड स्कॅन करताच ती वास्तू बोलते. समजा प्राणी, पक्षिदालनात गेल्यास, ‘मी पक्षी बोलतोय्… नमस्कार राजेश आपले स्वागत आहे.’ नंतर तो स्वत:विषयी माहिती सांगतो. एक मिनिटाची ही माहिती असते.
अजब बंगल्याचे डिजिटलायझेशन
‘मी अजब बंगला बोलतोय्…’ या नावाने अॅप तयार करण्यात आले आहे. पर्यटक, अभ्यासक आणि इतिहासप्रेमींची संख्या वाढत असून, कमी वेळात अधिक माहिती मिळते. डिजिटलायझेशनमुळे विद्यार्थी आणि युवकांत उत्सुकता आहे.
जया वाहाणे
अभिरक्षक,मध्यवर्ती संग्रहालय, नागपूर