अमरदिप बडगे, प्रतिनिधी
– दोन्ही पाय निकामी
– कामठा-सिंदिटोला मार्गावरील घटना
गोंदिया :- अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरने शिंदीटोला(कामठा)येथील एका वृद्ध इसमाला धडक देऊन जखमी केल्याची घटना सोमवारी(ता.28) सकाळी सात च्या सुमारास घडली. या अपघातात सदर वृद्धाचे दोन्ही पाय निकामी झाले असुन सदर जखमी वृद्धाचे नाव केशोवराव मटाले वय 62 वर्षे असे आहे. तर सदर ट्रॅक्टर चे क्रमांक MH-35AG 4854 असे असुन तो कामठा येथील तिवारी नामक रेती तस्कराचा असल्याचे बोलले जात आहे.
सदर वृद्ध इसम सकाळी कोवळे उन् शेकण्यासाठी रस्त्याचा बाजूला असलेल्या आपल्या घरासमोर उभा असताना अवैध रेती भरून आलेल्या भरधाव ट्रॅक्टर ने त्याला धडक दिली. त्यात वृद्धाचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत.
शिंदीटोला, घाटटेमनी परिसरातून पांगोली नदी वाहत असुन यात मोठ्या प्रमाणात रेती उपलब्ध आहे. सदर रेती चोरून नेण्यासाठी परिसरातील रेती तस्कर रात्री-अपरात्री मोठी स्पर्धा करीत असतात. सदर घटना स्पर्धेतुनच झाली असल्याची बोलले जात आहे.सदर परिसर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी इथपर्यंत पोहचत नाही त्यामुळे येथील रेती तस्कर स्थानिक महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांशी आर्थिक देवाणघेवाण करीत मोकाटपणे रेती तस्करी करीत असल्याचे बोलले जात आहे. सदर ट्रॅक्टर एक हमाल चालवीत असल्याची बाब हि समोर आली आहे. या अवैध रेती वाहतुकीमुळे स्थानिक नागरिकांचा जीव टांगणीला आला असुन नव्याने रूजू झालेले पोलिस अधीक्षक या रेती तस्करावर कारवाई करतील काय?असा प्रश्न परिसरातील नागरिक विचारीत आहेत. रावणवाडी पोलिसांनी तातडीने कारवाई करीत जखमी वृध्दाला तात्काळ दवाखान्यात पोहोचविले. पुढील तपास पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात रावनवाडी पोलीस करीत आहेत.