संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा -कामठी मार्गावरील मोरबी टाईल्स समोर मॉर्निंग वॉकिंग करून घरी परत येत असलेल्या शिक्षकाला मागेहून भरधाव वेगाने येत असलेल्या अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत अपघाती मृत्यु झाल्याची घटना आज सकाळी साडे पाच दरम्यान घडली असून मृतक शिक्षकाचे नाव कृष्णराव आरेकर वय 58 वर्षे रा शुभम नगर येरखेडा असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक शिक्षक हे नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकिंग करून सहपाठी मित्रासोबत घराकडे परत येत असता मागेहून भरधाव वेगाने येत असलेल्या अज्ञात वाहनचालकाने दिलेल्या जोरदार धडकेत घडलेल्या गंभीर अपघातात जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून आजनी रोड वरील नवीन मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.पोलिसांनी घटनेची नोंद करीत अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.मृतकाच्या पाठीमागे कुटुंबात पत्नी,एक मुलगा व एक मुलगी असा आप्तपरिवार आहे.