– महामहोपाध्याय स्व. पं. प्रभाकरराव खर्डेनवीस जन्मशताब्दी महोत्सव
नागपूर :- स्व. पं. प्रभाकरराव खर्डेनवीस यांनी ज्या कलेला आयुष्य समर्पित केले, त्या शास्त्रीय संगीताबद्दल नवीन पिढीमध्ये गोडी निर्माण करणे हे मोठे आव्हान आहे. ते आपण साध्य करू शकलो तर तीच प्रभाकरराव खर्डेनवीस यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (रविवार) केले.
आयटी पार्क येथील पर्सिस्टंट सभागृहात आयोजित महामहोपाध्याय स्व. पं. प्रभाकरराव खर्डेनवीस जन्मशताब्दी महोत्सवात ना. गडकरी बोलत होते. यावेळी उषा खर्डेनवीस, जन्मशताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. श्यामसुंदर खर्डेनवीस, संयोजक रविंद्र जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. ते म्हणाले, ‘लोकांचे मनोरंजन आवश्यक आहे, पण त्याच वेळी त्यांचे प्रबोधन करणेही आवश्यक आहे.
भारतीय शास्त्रीय संगीत नवीन पिढीपर्यंत पोहोचविणे हेही महत्त्वाचे काम आहे. पं. प्रभाकरराव यांच्यासारखे तज्ज्ञ आज आपल्यात नाहीत. पण शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील गुरूंच्या माध्यमातून, तज्ज्ञांच्या माध्यमातून नवीन पिढीमध्ये शास्त्रीय संगीताबद्दल आकर्षण निर्माण करणे शक्य आहे. शास्त्रीय संगीत अधिक लोकप्रिय करणेही शक्य आहे.’ शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देताना ना.गडकरी म्हणाले, ‘मी दादासाहेब धनवटे नगर विद्यालयाचा विद्यार्थी होतो. आमच्या शाळेला ५० वर्षे पूर्ण झाली तेव्हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यात ‘संगीत सौभद्र’ या नाटकाचाही समावेश होता. या आयोजनाचे संपूर्ण मार्गदर्शन राजाभाऊ कोगजे आणि पं. प्रभाकरराव खर्डेनवीस यांनी केले होते.’
‘विदर्भाचे योगदान मोठे’
शास्त्रीय संगीताच्या परंपरेत विदर्भाचे योगदान मोठे आहे. स्व. वसंतराव देशपांडे, स्व. प्रभाकरराव खर्डेनवीस यांच्यासारख्या मंडळींनी शास्त्रीय संगीतात विदर्भाचा नावलौकिक वाढवला. त्यांनी उत्तम शिष्य तर तयार केलेच, शिवाय शास्त्रीय संगीत समजणारा एक जाणकार वर्गही तयार केला, या शब्दांत ना. /गडकरी यांनी विदर्भातील शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गजांचे योगदान अधोरेखित केले.