– ओडिशाहून आणलेला गांजाची विदीशात होती डिलिव्हरी, रेल्वेच्या तिकीट केंद्रातून अटक
नागपूर :-पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेला इसम रेल्वेने अंमलीपदार्थाची तस्करी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या छोट्याशा माहिती वरून लोहमार्ग पोलिसांनी तस्कराच्या मुसक्या आवळल्या. गंगाराम अहिरवार (45) रा. विदीशा (भोपाळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून सव्वासहा किलो गांजा जप्त करून त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने 11 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांना माहिती मिळाली की, एक इसम पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेला असून तो रेल्वेने गांजा तस्करी करीत आहे. वेळ आणि गाडी संदर्भात माहिती नव्हती. तसेच त्याचे वर्णनही दिले नव्हते. त्यामुळे शेकडो गाड्यांचे संचालन आणि हजारो प्रवाशात आरोपीला हुडकून काढणे पोलिसांसमोर मोठे आव्हाण होते. पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेले अनेक लोक असतील, त्यामुळे काशीद यांनी डीबीच्या पथकाला बोलावून सूचना दिल्या. एपीआय कविकांत चौधरी, हवालदार संजय पटले, पुष्पराज मिश्रा, अमित त्रिवेदी, प्रवीण खवसे आणि भुपेश धोंगडी हे सर्व वेगवेगळ्या दिशेने तपासाला लागले. रेल्वे स्थानक परिसर पिंजून काढला. गाड्यांचा ताबा घेवून डब्यात झडती घेतली.
दरम्यान आरोपी गंगाराम रेल्वे तिकीट केंद्रात बसला होता. त्याच्या जवळ एक पांढर्या रंगाची प्लॅस्टिकची बादली आणि एक बॅग होती. त्याचा अंगात पिवळ्या रंगाचा शर्ट होता. पोलिसांनी रिक्स घेवून त्याला ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याच्या बादली आणि बॅगमध्ये तीन पॅकेट मिळून आले. त्यात सव्वासहा किलो गांजा आढळला. ओडिशाहून आणलेला गांजा विदीशाला पोहोचविणार असल्याचे त्याने तपासादरम्यान पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याच्या विरूध्द गुन्हा नोंदवून अटक केली. पोलिस अधीक्षक डॉक्टर अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.
– भूमिका गौतम मेश्राम