संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– मॅनेजर ने केली 16 लक्ष 91 हजार 750 रुपयाची फसवणूक
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या निर्मल अर्बन को ऑपरेटिव्ह बँक कामठी च्या मॅनेजर ने बँकेतील कर्जदाराची प्रोजेक्ट स्कीम सुरू असल्याची बतावणी करून कर्जदार ग्राहकाची 16 लक्ष 91 हजार 750 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना नुकतीच निदर्शनास आली असून यासंदर्भात पीडित फिर्यादी बँक कर्जदार संजीव बळीराम मेश्राम वय 58 वर्षे रा कोळसाटाल कामठी ने जुनी कामठी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी बँक मॅनेजर सचिन प्रकाशराव बोंबले विरुद्ध भादवी कलम 420,409,506 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर फिर्यादी संजीव मेश्राम यांनी निर्मल अर्बन को ऑपेरेटीव्ह बँक कामठी येथून आपली प्रॉपर्टी गहाण ठेवून त्यावर 19 लक्ष रुपयांचे कर्ज घेतले असता येथील बँक मॅनेजर आरोपी सचिन बोंबले ने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सदर फिर्यादीला बँकेत प्रोजेक्ट स्कीम सुरू असल्याचे सांगून त्यांना आमिष दाखवून त्यांचेकडून कर्जाचे घेतलेले 19 लक्ष रुपये घेतले तसेच फिर्यादीने आपल्या बँक खात्यात जमा असलेले 8 लक्ष रुपये असे एकूण 27 लक्ष रुपये मॅनेजर ने जमा करून घेतले. त्यापैकी 5 लक्ष रुपये व स्कीम अंतर्गत 4750 रुपये दररोज याप्रमाणे 5 लक्ष 8 हजार 250 रुपये असे एकूण 10 लक्ष 8 हजार 250 रुपये फिर्यादीला परत केले मात्र उर्वरित 16 लक्ष 91 हजार 750 रुपये परत न केल्याने फिर्यादीची आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी संजीव मेश्राम ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मॅनेजर सचिन बोंबले विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.