नागपूर :- सध्या समाजाची स्थिती भयावह झालेली आहे. महिला आणि मुली सुरक्षित नाहीत. मुलींवरच्या अत्याचारांच्या असंख्य घटनांनी समाज चिंतित आहे. गॅंग रेप सारख्या घटना घडत आहेत. यावर भाष्य करणारे, अशा घटनांची मानसिकता शोधणारे नाटक ‘व्रणिता’ आज मंगळवारी सादर करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे ६३वी राज्य नाट्य स्पर्धा डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सुरू आहे. या स्पर्धेत सलीम शेख लिखित व दिग्दर्शित हे दोन अंकी नाटक ‘राजाराम सीताराम दीक्षित वाचनालय’ धरमपेठ तर्फे सादर करण्यात आले. नाटकात जननीची भूमिका आयेशा शेख, आदी – अक्षय गुल्हाने, राहील – किशोर धंदरे, अवि – भावेश सिडाम, संजू – प्रियांशू नाईक, डॉक्टर – प्रांशू गोखले, देवी – तनुश्री चव्हाण, जगु – मनीष उईके, दु:शासन – मंगेश रवराळे, आई – सुजाता शिंदे, मावशी – नलिनी बनसोड, इन्स्पेक्टर – सुशील मून, ऑटोवाला – रोहन शेलारे आणि बाबाची भूमिका सलीम शेख यांनी साकारली. सूचक नेपथ्य सौरभ दास, सतीश काळबांडे यांचे होते. समोर जो दरवाजा लावला होता त्याचा अडसर प्रेक्षकांना झाला. याशिवाय नेपथ्य चांगले होते. प्रसंगाला पूरक अशी प्रकाश योजना मिथुन मित्रा यांनी केली. स्वतः लेखकच दिग्दर्शक असल्याने अनेक प्रसंगात दिग्दर्शकीय कौशल्य जाणवले. घटनांचा बारीक-सारीक विचार आणि त्याचे सादरीकरणाचा विचार त्यावरचे परिश्रम दिग्दर्शकाने घेतले होते. सर्वच कलावंतांनी यात भूमिका करताना आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला. विशेषतः जननी, जग्गू, बाबा, आदिनाथ प्रेक्षकांच्या लक्षात राहणारे होते. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात हे नाटक बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाले.
पार्श्व संगीत सौरभ दास यांनी केले तर सहाय्य हेमंत डिके यांनी केले. रंगभूषा नकुल श्रीवास आणि नलिनी बनसोड यांची होती. वेशभूषा पूजा पिंपळकर भोयर, अश्विनी पिंपळकर, नृत्य – तनुश्री चव्हाण, ध्वनिमुद्रण ऑडिओ अँड स्टुडिओ, नागपूर, चारुदत्त जिचकार यांचे होते. या नाटकाची निर्मिती – अभिनय चनाखेकर, अभिषेक चनाखेकर, शेख सुलतान, राजेश काळे आणि नलिनी सलीम यांची होती. सूत्रधार सचिन गिरी तर रंगमंच व्यवस्था रूचिया पंडिया खुळे, अजय खोब्रागडे, राही गौर, विनोद भोयर, अमित शेंडे, मंगेश पैंदोर यांनी पाहिली. नाटकाला अनिल चनाखेकर, वसंत दक्षिणकर, महेश पातुरकर, डॉ. नीलकांत कुलसंगे, सारंग अभ्यंकर, प्रा. शिशिर वर्मा, विवेक खेर यांनी मार्गदर्शन केले.
जननी ही बारावीची विद्यार्थिनी आपल्या आई सोबत राहते. ती देवीची सेवा वडिलांच्या निधनानंतर करीत असते. मंदिरातच राहणारे बाबा तिच्यावर मुलीसारखं प्रेम करतात अनाथ जगु गुंड सुद्धा मंदिराच्या पायऱ्यांवर राहतो. जातीभेदाने प्रेमभंग झालेला आदिनाथ वेडा झालेला आहे. एक दिवस रात्री परत येत असताना जननीवर गॅंगरेप होतो. त्याच्या त्या अत्याचाराचा बदला जननी घेते. अशा आशयाचे हे नाटक होते.