यवतमाळ :- कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग व जिल्हा मृद सर्वेक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मृदा दिन व शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम कृषि विज्ञान केंद्रात आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे होते. उद्घाटक म्हणून वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सुरेश नेमाडे, प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी अधिकारी डॉ.अशितोष लाटकर, उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त जगदीश चव्हाण, मृद चाचणी अधिकारी विनोद चव्हाण, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रगतशील शेतकरी बाबा कपिले व शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य उपस्थित होते.
अध्यक्षीय मार्गदर्शनामधे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डाबरे यांनी माती सजीव राहण्यासाठी अवाजवी रासायनिक खतांचा वापर टाळावा व माती परीक्षण आधारित खत व्यवस्थापन करावे, असे सांगितले व नैसर्गिक शेतीचे महत्व विषद केले. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.नेमाडे यांनी मातीचे योग्य संवर्धन व संरक्षण या विषयी मार्गदर्शन केले. चाचणी अधिकारी विनोद चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. जागतिक मृदा दिनाचे महत्त्व व उद्देश त्यांनी सांगितला. प्रभारी सहयोगी संशोधन संचालक डॉ.अशितोष लाटकर यांनी जमिनीचा सेंद्रीय कर्ब वाढविण्यासाठी हिरवळीच्या खताचे महत्व सांगितले.
कृषी विज्ञान केंद्रातील कीटकशास्त्र डॉ.प्रमोद मगर यांनी कीड व रोग व्यवस्थापन, पशुसंवर्धन शास्त्रज्ञ डॉ.गणेश काळूसे यांनी शेतीपूरक व्यवसाय कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय या विषयी मार्गदर्शन केले. उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त जगदीश चव्हाण यांनी आधुनिक शेती पद्धतीचे महत्व, मंचाचे उपाध्यक्ष प्रगतशील शेतकरी बाबा कपिले यांनी सेंद्रीय शेती या विषयी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी मान्यवरांच्याहस्ते घडीपत्रिकेचे विमोचन व मृद आरोग्य पत्रिका वितरण करण्यात आले. कार्यक्रमास कृषी अभियांत्रिकी शास्त्रज्ञ राहुल चव्हाण, गृह विज्ञान शास्त्रज्ञ एस. पी. भागवत, प्रयोगशाळा तंत्रज्ञ विशाल राठोड तसेच कृषी विभाग व आत्माचे अधिकारी, कर्मचारी सचिन पाईकराव, विष्णू गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन शास्त्रज्ञ मयूर ढोले यांनी केल् तर संजय भोयर यांनी आभार मानले.