नागपूर :- श्री रामचंद्र बहुद्देशीय संस्था, नागपूरच्या वतीने महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य संचालनालया द्वारे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सुरु असलेल्या नागपूर केंद्रावरील प्राथमिक स्पर्धेत प्रवीण खापरे लिखित व चैतन्य दुबे दिग्दर्शित ‘जंगोम सेना” या नाटकाचे सादरीकरण झाले. विशेष म्हणजे, सिंधुदुर्ग येथील कुडाळमध्ये आयोजित कै. बाबा वर्दम नाट्यमहोत्सवात हे नाटक केवळ आणि केवळ ‘तुमची भाषा आमच्या प्रेक्षकांना कळणार नाही हे कारण पुढे करून नाकारण्यात आले आहे. त्याचे पडसादही महाराष्ट्रभर उमटले आहेत. त्यामुळे, या नाटकाच्या सादरीकरणाला वेगळे महत्व प्राप्त होते.नैसर्गिक आवासात मानवी अस्तित्वाचे आणि जगण्यासाठी संघषांचे प्रतिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दंडकारण्यातले वर्तमानातील वास्तव “जंगोम सेना” या नाटकाद्वारे जगापुढे आणण्यात आले आहे.
प्राचिन काळी दडक ऋषीच्या वास्तव्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या दंडकारण्यात माडिया आणि गौड जमात वास्तव्यास आहे. साधारणत ७०-८०च्या दशकापासून देशात फोफावलेल्या नक्षलवादाचा तेथील वनवासींच्या जीवनावर झालेला दुष्परिणाम, नक्षलवादाचे माओवादात झालेले रूपांतरण आणि त्यानंतर सुरू झालेला मुलनिवासींचा कत्लेआम या नाटकात मांडण्यात आला आहे. त्यासाठी काही सत्य घटनांचा आधार घेण्यात आला आहे. संविधानाला विरोध करणाऱ्या “लाल सलाम” च्या विरोधात संघर्ष करण्याशिवाय या भागात पर्याय उरलेला नाही. त्यासाठी १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धात आदिम जननायक विर बाबूराव शेडमाके यांनी परकीय इंग्रजी सत्तेविरोधात पुकारलेला ‘जंगोम (युद्ध) ‘चा इतिहास मांडण्यात आला आहे. त्यांनी पुकारलेल्या संघर्षाची प्रेरणा घेऊन वर्तमानात आदिमांनी माओवादाविरोधात जंगोम पेटवण्याची प्रेरणा घेण्याचे आवाहन या नाटकातून करण्यात आले आहे. हा जंगोम केवळ विरोधाचा नव्हे तर संविधानाचा जागर करत भारत, भारतीय संस्कृती, परंपरा आणि मुलनिवासींचे अस्तित्व टिकवण्याचे आवाहनही करतो, हे इथे प्रतिपादित करण्यात आले आहे.
नाटकाचे सुत्रधार जनसंघर्ष समितीचे दत्ता शिर्के आहेत. गीत प्रवीण खापरे, संगीत दिग्दर्शन संकेत जोशी तर गायन संकेत जोशी, संकेत दातेराव व जगदीश गेडाम यांचे आहे. नृत्य दिग्दर्शन श्रीकांत धबडगावकर, पार्श्वसंगीत संचालन अमेय दुबे, प्रकाश योजना ऋषभ धापोडकर, नेपथ्य सुनील हमदापुरे, वेशभूषा हर्ष नागभिडे व पुण्यशील लांबट, रंगभूषा सेजल शिंदे यांची आहे. नाटकात चैतन्य दुबे, मानस मांडवगडे, निकिता तेलंगे, जय भूते, श्रीकांत धबडगावकर, जयंत कुझेकर, निहार पल्लवी, हर्षल जाउळकर, सेजल शिंदे, शशांक राहांगडाले, हर्ष वाघमारे, नयन सेलवटकर, छकुली जाधव, सुकेश रामटेके, रविकांत मालपुरी, आयुष मुळे, शंकुतला बागडे, नयन ठाकरे, शुभम निकम, श्रद्धा रोकडे, मधुरा हमदापुरे, साहिल श्रीवास, कौशिक बनसोड व बालकलाकार नेत्रा कुकडे यांनी प्रमुख पात्र साकारले आहेत.नाट्य स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष अजय पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी रघुवीर जोशी, महेश पातुरकर, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संदीप शेंडे,प्रज्ञा पाटील, वसंत खडसे, पूजा पिंपळकर उपस्थित होते. यावेळी सर्व सहभागी संस्थांचे स्वागत करण्यात आले. आज दि. २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता पिराश्री बहुउद्देशीय संस्थेतर्फे फर्टीलाईझर हे नाटक सादर होईल.