जातीजमातीमध्ये संघर्ष घडविण्याचा काँग्रेस आघाडीचा कट हाणून पाडा – धुळे येथील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

धुळे :- देशातील जातीजातींमध्ये संघर्ष पेरण्याचा धोकादायक कट काँग्रेस व महाविकास आघाडीने रचला असून त्यापासून महाराष्ट्राने व देशाने सावध रहावे, असा गंभीर इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी धुळे येथे महायुतीच्या प्रचाराकरिता आयोजित विशाल जाहीर सभेत बोलताना दिला. काँग्रेस व त्यांच्या साथीदारांच्या या कटापासून जनतेला सावध करणे हे माझे कर्तव्य आहे,असे सांगून,स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत जातीजमातींमध्ये संघर्ष रुजविण्याचेच काम केले, असा आरोपही त्यांनी केला.काँग्रेसचा हा इतिहासच आहे, आणि तोच वारसा काँग्रेसच्या युवराजांनी पुढे चालविला आहे, अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधींवरही अप्रत्यक्षपणे नेम साधला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे,प्रतापराव जाधव, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आ.अमरीश पटेल, खा.स्मिता वाघ,डॉ. सुभाष भामरे व धुळे जिल्ह्यातील भाजपा महायुतीचे उमेदवार उपस्थित होते.

काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांना दलित, मागसवर्गीय, आदिवासींची प्रगती सहन होत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न केले, पण पंडित नेहरूंनी दलित, मागासवर्गीय आदिवासींना आरक्षण मिळू नये यासाठी शिकस्त केली. महत्प्रयासाने बाबासाहेबांनी आरक्षणाची तरतूद केली, पण त्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. नेहरूंनंतर इंदिराजींनीही तीच आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. इंदिराजींनंतर राजीव गांधीही त्याच विचाराचे वारस होते. त्यांनीही ओबीसी आरक्षणास जाहीर विरोध केला होता. हे आरक्षण झाले तर त्यांच्या राजकारणाचे दुकान बंद होईल, ही त्यांना भीती वाटत होती. आज त्याच भयापोटी काँग्रेसचे युवराज काम करत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. मागासवर्गीय, अनुसूचित जातीजमातींमध्ये भेद निर्माण करून त्यांची संघटित शक्ती कमजोर करावी हीच काँग्रेसची नीती आहे, असे मोदी म्हणाले.

केंद्रातील भाजपा सरकारच्या ‘सबका साथ सबका विकास’ या संकल्पाचा आदिवासी हा प्रमुख घटक आहे. देशाच्या स्वातंत्र्यात, विकासात आदिवासींचा मोठा वाटा होता, पण काँग्रेसने आदिवासींकडे दुर्लक्ष केले. आदिवासी संस्कृतीला न्याय मिळावा, आदिवासी युवकांचे भविष्य आश्वस्त व्हावे यासाठी काम करावयास हवे होते. पण काँग्रेसने ही जबाबदारीही नाकारली. केंद्रातील वाजपेयी सरकारने पहिल्यांदा आदिवासींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले, आणि आदिवासींना न्याय मिळाला, असे पंतप्रधान म्हणाले.

राजकारणात प्रत्येकाचे काही ध्येय, संकल्प असतात. आम्ही जनतेच्या सेवेसाठी राजकारणात आलो आहोत, तर काहीजण लोकांना लुबाडण्यासाठी येतात, असे सांगून पंतप्रधानांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढविला. महाआघाडीसारखे लोक जेव्हा सत्तेवर येतात, तेव्हा विकास थांबवितात, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार करतात, जनतेला धोका देऊन सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीची सत्ता तुम्ही अनुभवली आहे. त्यांनी पहिल्यांदा सरकार लुबाडले, नंतर विकासाची कामे रोखली. महायुतीचे सरकार सत्तेवर आले, त्यामुळे ही स्थिती बदलली. गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारने महाराष्ट्राच्या विकासाचे नवे विक्रम प्रस्थापित केले असून विकासाचा विश्वास पुन्हा प्रस्थापित झाला आहे. भाजपा-महायुती आहे, म्हणून विकासाची गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. महायुतीने महाराष्ट्राला नवी समृद्धी देणारा वचननामा तयार केला आहे. हा वचननामा म्हणजे विकासाची वाढणारी गती, महाराष्ट्राची हमखास प्रगती असून या वचननाम्यात प्रत्येक समाजघटकाच्या आर्थिक प्रगतीची योजना आहे, समानतेची भावना आहे, सुरक्षिततेची भावना आणि ‘सबका साथ’चा विश्वास आहे. अशा कल्याणकारी योजनांमुळे महायुतीचा वचननामा हा विकसित महाराष्ट्राचा, विकसित भारताचा आधार होईल, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.

विकसित महाराष्ट्रासाठी, विकसित भारतासाठी महिलांचे जीवन सुसह्य बनविणे, त्यांना सशक्त करणे गरजेचे आहे. महिलांची प्रगती ही समाजाची गतिमान प्रगती असते, म्हणूनच गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना राबवल्या. सरकारने महिलांकरिता लष्करासह अधिकाधिक क्षेत्रांत नव्या संधींचे सारे दरवाजे उघडले. विधानसभा आणि संसदेत महिलांसाठी आरक्षणाचा अधिकार दिला, प्रत्येक घरातील महिलांकरिता योजना जारी केल्या, तेव्हा काँग्रेसचे लोक आमची थट्टा करत होते. पण याच योजना आज महिलांच्या सशक्तीकरणाच्या योजना ठरल्या असून राज्यातील महायुती सरकार आमच्या संकल्पाच्या पूर्ततेचे काम करत आहे याबदद्ल त्यांनी समाधान व्यक्त केले. पोलिस भरतीत महिलांना संधी देण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयामुळे महिलांची सुरक्षितता वाढेल आणि मुलींना रोजगार मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महिला सशक्तीकरणासाठी आम्ही जी पावले टाकत आहोत, त्यामुळे काँग्रेस आणि त्यांचे साथीदार अस्वस्थ झाले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही देशाच्या कानाकोपऱ्यात लोकप्रिय होत आहे, पण काँग्रेसचे पाठिराखे या योजनेविरुद्ध कोर्टापर्यंत पोहोचले. सत्ता मिळाली तर सर्वात आधी ही योजना बंद करू, असा काँग्रेसचा इरादा आहे. या योजनेचा लाभ महिलांना मिळायला हवा, त्यांना पुढे जाण्याची संधी मिळायला हवी, हे लक्षात घ्या आणि आघाडीवाल्यांपासून सावध रहा. नारीशक्तीस सशक्त होण्याची प्रक्रिया त्यांना सहन होत नाही. काँग्रेस आणि आघाडीचे लोक महिलांविषयी अभद्र टीप्पणी करू लागले आहेत. महिलांचा अपमान करण्याच्या आघाडीवाल्यांच्या हीन प्रवृत्तीस कोणतीच माताभगिनी माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मातृभाषा ही आपली दुसरी आई असते. आमच्या सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. या निर्णयानंतर देशविदेशातील मराठी भाषिकांनी समाधान व्यक्त केले. मराठीजनांचे हे जुने स्वप्न आमच्या सरकारने पूर्ण केले आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही कित्येक दशकांपासून जनतेची मागणी होती पण केंद्रात आणि राज्यात सरकारे असूनही काँग्रेसने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी काही केले नाही. महाराष्ट्राच्या नावाने राजकारण करणाऱ्या आघाडीचा हा खरा चेहरा आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

आज विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला पहिली पसंती मिळत आहे. गेल्या दोन वर्षांत 50 टक्क्यांहून अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. सर्व उद्योगांसाठी महाराष्ट्र हे पहिल्या पसंतीचे राज्य ठरले आहे. राज्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत अनेक उद्योग उभे राहात आहेत. देशातील सर्वात मोठे बंदर वाढवण येथे निर्माण होत आहे. पायाभूत सुविधांच्या नव्या प्रकल्पांतून नव्या संधी निर्माण होत आहेत, असे सांगून पंतप्रधानांनी महाराष्ट्रास आणखी एक आनंदवार्ताही दिली. ते म्हणाले, मी वाढवण बंदराच्या पायाभरणीसाठी आलो होतो, तेव्हा महाराष्ट्रात एक विमानतळ हवा, अशी मागणी देवेंद्रजींनी केली होती. आचारसंहिता संपल्यानंतर, जेव्हा पुन्हा महायुती सरकार सत्तेवर येईल, तेव्हा त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी जातीने काम करेन, असे आश्वासन त्यांनी दिले.

धुळे परिसरात वेगवान विकास होत आहे. पायाभूत सुविधांवर हजारो कोटी रुपये खर्च केले जात आहेत, रस्ते, रेल्वेमार्गांच्या योजनांमुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना डबल इंजिन सरकारमुळे दुहेरी फायदा मिळत आहे. पीएम किसान सन्मान निधीबरोबरच महायुती सरकारच्या सहा हजार रुपयांमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दर वर्षी थेट 12 हजारांची मदत जात आहे. आता ही रक्कम 15 हजार रुपयांपर्यंत वाढविण्याची घोषणा महायुतीने केली आहे. याचा मोठा फायदा राज्यातील शेतकऱ्यांस मिळणार आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामामुळे काँग्रेसने खोदलेल्या खड्ड्यांतून त्यांना बाहेर काढणे शक्य झाले आहे असे सांगून पीक विमा, किमान आधारभूत किंमत आदी योजनांची यादीच पंतप्रधांनांनी मांडली.

स्वातंत्र्यानंतर काँग्रेस विसर्जित करावी अशी महात्मा गांधींची इच्छा होती. पण काँग्रेस नेहमीच देशाचे तुकडे करण्याच्या कटाचा हिस्सा राहिली. जम्मू काश्मीर हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. त्यांनीच 370 कलम लागू करून देशापासून जम्मू काश्मीरला अलग ठेवले. आंबेडकरांची घटना जम्मू काश्मीरमध्ये लागू न करण्याचे कारण काय होते, याचा जबाब त्यांना द्यावा लागेल. याच कटामुळे दलित, मागासवर्गीयांना त्यांच्या हक्कापासून वंचित रहावे लागले. आम्ही कलम 370 रद्द करून या साऱ्या समस्या संपुष्टात आणल्या आहेत.जम्मू काश्मीरात सत्ता मिळताच काँग्रेस व त्यांचे साथीदार पुन्हा 370 कलम लागू करण्याचा ठराव करून जुना कट पुन्हा रचू पाहात आहेत, असा आरोप त्यांनी केला. देशाची जनता हे कदापि सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. काँग्रेसचा हा हीन चेहरा संपूर्ण देशासमोर आणायला हवा. काँग्रेस आघाडी संविधानाची प्रत म्हणून कोरे कागदवाली पुस्तके फडकावत आहेत, असा आरोपही मोदी यांनी केला.

पाकिस्तानचा अजेंडा देशात राबविण्याचे प्रयत्न करू नका, अलगाववादाची भाषा करू नका, जोपर्यंत मोदी सरकारला जनतेचा आशीर्वाद आहे, तोवर तुमचे हे मनसुबे यशस्वी होणार नाहीत. काश्मीरमध्ये केवळ बाबासाहेबांचे संविधान लागू राहील, जगातील कोणतीही शक्ती त्यामध्ये अडसर आणू शकणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

देशभर बिरसा मुंडा जयंती वर्ष साजरे करणार

देशातील आदिवासी परंपरांना ओळख मिळावी यासाठी 15 नोव्हेंबर पासून पुढे वर्षभर भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मजयंती महोत्सव साजरा करणार असल्याची घोषणाही पंतप्रधानांनी याप्रसंगी बोलताना केली. भाजपाच्या प्रयत्नांमुळेच द्रौपदी मुर्मू या आदिवासी महिला देशाच्या पहिल्या राष्ट्रपती झाल्या, पण काँग्रेस व त्यांच्या साथीदारांनी द्रौपदी मुर्मूंच्या पराभवासाठीही शिकस्त केली होती. काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांच्या पराभवासाठी काम केले, असा आरोप पंतप्रधानांनी केला.

“एक है तो सेफ है…”

आदिवासी जमातींचे ऐक्य हीच त्यांची ओळख आहे, पण काँग्रेस या जमातींमध्ये आपापसात संघर्ष घडवू पाहात आहे, असा आरोप त्यांनी केला. आदिवासींचे ऐक्य ही त्यांची ओळख आहे, तीच पुसून टाकण्याचा काँग्रेसचा अजेंडा आहे. हाच कट काँग्रेसने धर्माच्या नावाने आखला, तेव्हा देशाची फाळणी झाली होती, याकडे लक्ष वेधून ते म्हणाले, देशाच्या विरोधात यापेक्षा मोठा विघातक कट असू शकत नाही.” एक है तो सेफ है… हमे एकजूट रहकर काँग्रेसके खतरनाक खेल को नाकाम करके विकास के रास्तेपर आगे बढते रहना है…”

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महायुतीचे सरकार बहुजन समाज व शेतकऱ्यांवर अन्याय करणारे - नरेंद्र पहाडे

Fri Nov 8 , 2024
– म्हणून सत्ता परिवर्तनाची गरज भंडारा :- महाराष्ट्र राज्यातील ट्रीपल इंजिन असलेल्या महायुतीच्या हिटलर , हुकूमशाही सरकारने ओबीसी समाजाची जात निहाय जनगणना केली नाही,लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण दिले नाही,त्यामुळे ओबीसी समाजाचा विकास कोसो दूर आहे. एक संघ असलेल्या एस सी,एस टी समाजाच्या आरक्षणाचे उप वर्गीकरण करून जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा कुटील प्रयत्न केला जात आहे.ओबोसी आरक्षणाचे नाव पुढे करून राज्यातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com