‘राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते 70 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान

– मिथुन चक्रवर्ती ‘दादासाहेब फाळके पुरस्काराने’ सन्मानित

नवी दिल्ली :- 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आज विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते आज आयोजन करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना ‘दादासाहेब फाळके जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विज्ञान भवनात 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन, माहिती व प्रसारण विभागाचे सचिव संजय जाजू आणि पर्यवेक्षक समितीचे अध्यक्ष मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. आज प्रदान झालेले पुरस्कार वर्ष 2022 चे आहेत.

‘ममर्स ऑफ द जंगल’, ‘वारसा’, ‘या मराठी चित्रपटांनाही विविध श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले. फिचर फिल्म श्रेणीत 38 पुरस्कार जाहीर झाले. यात विविध भाषेतील उत्कृष्ट चित्रपटांचाही समावेश आहे. तर नॉन फिचर फिल्ममध्ये विविध श्रेणीमध्ये 18 पुरस्कार जाहीर झाले.

मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार

मिथुन चक्रवर्ती यांनी ‘सुरक्षा’, ‘मृगया’, ‘डिस्को डान्सर’, ‘अग्निपथ’ यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. ‘मृगया’ (1976) या त्यांच्या पहिल्या चित्रपटानेच त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला होता. ‘डिस्को डान्सर’ (1982) या चित्रपटाने त्यांना अखंड भारतभर प्रसिद्धी मिळवून दिली. आता त्यांच्या चित्रपटसृष्टीतील दीर्घकालीन योगदानाबद्दल त्यांना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार ‘मर्मर्स ऑफ द जंगल

नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार ‘मर्मर्स ऑफ द जंगल’या लघुपटला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार चित्रपटाचे निर्देशक व दिग्दर्शक सोहेल वैद्य यांनी स्वीकारला. “मर्मर्स ऑफ द जंगल” हा एक लघुपट आहे, जो भारताच्या नैसर्गिक वारशाच्या, विशेषतः जंगलांच्या आणि वन्यजीवनाच्या संरक्षणाच्या आव्हानांवर प्रकाश टाकतो. हा लघुपट भारतीय जंगलांचे महत्त्व, त्यांच्यातील विविधता, आणि मानवाच्या हस्तक्षेपामुळे होणारा -हास यावर आधारित आहे. लघुपटाच्या माध्यमातून जंगलांचे संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाची आवश्यकता अधोरेखित केले आहे.

या लघुपटात भारतीय जंगलातील विविध वन्यजीव, वनस्पती, आणि त्यांच्याशी संबंधित समुदायांचे जीवन दर्शविण्यात आले आहे. प्रेक्षकांना जंगलाच्या संरक्षणाची जाणीव करून देणे आणि त्यांच्यामध्ये या मुद्द्यांबद्दल संवेदनशीलता निर्माण करणे, या माहितीपटाव्दारे संदेश देण्यात आला आहे.

आणखी एक मोहेनजोदारो यास सर्वोत्तम जीवनचरित्रात्मक ऐतिहासिक पुनर्निर्माण संकलन चित्रपटाचा पुरस्कार

नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम जीवनचरित्रात्मक ऐतिहासिक पुनर्निर्माण संकलन चित्रपटाचा पुरस्कार “आणखी एक मोहेन्जोदडो” या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार चित्रपटाचे निर्माते राजेश पेडणेकर व दिग्दर्शक अशोक राणे यानी स्वीकारला. “आणखी एक मोहेन्जोदडो” हा एक प्रभावशाली माहितीपट आहे ज्याचे दिग्दर्शन अशोक राणे यांनी केले आहे. या चित्रपटात गिरणगावाची कथा मांडण्यात आली आहे – मुंबईतील कापड गिरण्यांच्या सभोवतालची एक समृद्ध संस्कृती, जी 1850 च्या सुमारास फुलली. ‘गिरण्यांचे निवासस्थान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गिरणगावाने औद्योगिक क्रांतीच्या काळात जन्म घेतला, आणि एक अनोखी एकता अनुभवली. हे समाज सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध, सामाजिकदृष्ट्या लवचिक आणि राजकीयदृष्ट्या जागरूक होते. अनेक राजकीय चळवळींमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पण 1980 च्या दशकात गिरणी कामगारांच्या संपामुळे गिरणगावाच्या विनाशाची सुरुवात झाली.

सर्वोत्तम कला-संस्कृती चित्रपटाचा पुरस्कार ‘वारसा (लेगसी)’

नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम कला-संस्कृती चित्रपटाचा पुरस्कार “वारसा” (लेगसी) या माहितीपटाला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार चित्रपटाचे दिग्दर्शनक सचिन सुर्यवंशी यांनी स्वीकारला. या चित्रपटात शिवकालीन युद्ध कलेवर आधारित माहितीपटाला देखील पुरस्कार देण्यात आला आहे. ‘वारसा’ या माहितीपटाची निर्मिती कोल्हापुरातील सचिन बाळासाहेब सूर्यवंशी यांनी केली आहे तर या माहितीपटाला बेस्ट फिल्म नॉन फिक्शन गटातून फिल्मफेअर पुरस्काराने देखीलसन्मानित करण्यात आलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक युद्धतंत्र निर्माण केले होते. त्याचा वारसा आजही कोल्हापुरातील लोक जपतात असून याला शिवकालीन युद्ध कला या नावानेही ओळखले जाते.या माहितीपटातून याच युद्ध कलेचा वारसा कोल्हापुरातील स्थानिक कसे जपतात यासाठी सतत प्रयत्नरत असल्याचे चित्रण केले आहे.

सर्वोत्तम निवेदन आणि आवाजासाठी सुमंत शिंदे यांना पुरस्कार प्रदान

नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम निवेदन आणि आवाजाचा ‘मर्मर्स ऑफ द जंगल’या माहितीपटासाठी सुमंत शिंदे यांना सर्वोत्तम निवेदन आणि आवाजाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सर्वोत्तम बॉलिवुड दिग्दर्शक म्हणून सूरज बडजात्या यांना ‘ऊंचाई’ चित्रपटासाठी , केजीएफ 1: चॅप्टर २’ सर्वोत्तम कन्नड चित्रपट आणि सर्वोत्तम स्टंट कोरियोग्राफीचा पुरस्कार, ‘काबेरी अंतरधान’ सर्वोत्तम बंगाली चित्रपट, ‘ब्रह्मास्त्र’ या हिंदी चित्रपटासाठी बॉलिवुड संगीतकार प्रीतमला सर्वोत्तम संगीतकाराचा पुरस्कार, ‘फौजा’ साठी नऊशाद सदार खान यांना सर्वोत्तम गीतकाराचा पुरस्कार, ‘अपराजितो’ ला सर्वोत्तम निर्मिती रचनाचा पुरस्कार, ‘कांतारा’साठी ऋषभ शेट्टीला सर्वोत्तम अभिनेता, ‘थिरुचित्राम्बलम’साठी नित्या मेनन तर ‘कच्छ एक्सप्रेस’साठी मानसी पारिख यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.

वाळवी” या चित्रपटला सर्वोत्तम मराठी चित्रपटचा पुरस्कार जाहिर झाला होता. मात्र, आजच्या कार्यक्रमात याबाबतची घोषणा झाली नाही, याबाबत दिग्दर्शक परेश मोकाशी व त्यांच्या सहका-यांशी याविषयी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिधापत्रक धारकांना १ ऑक्टोबर पासून अन्नधान्य वितरण

Wed Oct 9 , 2024
नागपूर :-  कौटुंबिक शिधापत्रक धारकांनी ऑक्टोबर महिन्यातील मोफत अन्नधान्याचा लाभ घेण्याचे आवाहन नागपूर,अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्यातर्फे करण्यात आले आहे. ‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम-२०१३’ ची राज्यात अंमलबजावणी सुरु असून दर महिन्याच्या १ तारखेला शिधापत्रिका धारकांना अन्नधान्य वितरीत करण्यात येते तसेच या अधिनियमा अंतर्गत अनुज्ञेय असलेले अन्नधन्य १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीसाठी वितरीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com