गडचिरोली :- जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदांवर 89 अनुकंपा प्रतिक्षा यादीतील 89 उमेदवारांना निमणूक देण्यात आली. यासाठी 10 सप्टेंबर रोजी गट-क व गट-ड मधील प्रतिक्षासुचीमधील उमेदवारांना त्यांची जेष्ठता, शैक्षणिक अर्हता व पदांचे उपलब्धतेनुसार समुपदेशन घेण्यात आले होते.
गट-क संवर्गात एकुण 51 पदांवर तर गट-ड संवर्गात एकुण 38 पदांवर अशी एकुण 89 पदांवर जिल्हा परिषद प्रशासनाद्वारे नेमणूका देण्याची कार्यवाही करण्यात आली. यात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाची 08 पदे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संवर्गाची 12 पदे, कनिष्ठ आरेखक संवर्गाचे 01 पद, कंत्राटी ग्रामसेवक संवर्गाची 05 पदे, कनिष्ठ व्याख्याता संवर्गाचे 01 पद, अंगणवाडी पर्यवेक्षिका संवर्गाचे 01 पद, आरोग्य सेवक (पुरुष) संवर्गाचे 21 पदे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संवर्गाचे 02 पदे, परिचर संवर्गाची 36 पदे व चौकीदार संवर्गाची 02 पदांचा समावेश आहे. अनुकंपाधारक उमदेवारांना त्यांनी समुपदेशनाद्वारे स्विकारलेल्या पदावरील नियुक्ती आदेश संबंधित विभागाकडुन शैक्षणिक अर्हता व कागदपत्र पडताळणी करुन देण्यात येतील. पेसा क्षेत्रात दिलेल्या नेमणुका संबंधित प्रकल्प अधिकारी यांचे पेसा प्रमाणपत्र 08 दिवसांत सादर करण्याच्या अधिन राहून देण्यात आलेल्या आहेत.
सदर समुपदेशानाची कार्यवाही जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह (भा.प्र.से.) यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली व परिविक्षाधीन अधिकारी सिध्दार्थ शुक्ला (भा.प्र.से.), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) शेखर शेलार, यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली. समुपदेशन प्रक्रियेकरिता सहाय्यक प्रशासन अधिकारी फिरोज लांजेवार, कनिष्ठ प्रशासन अधिकारी रितेश वनमाळी, वरिष्ठ सहाय्यक अविनाश कुमरे व सामान्य प्रशासन विभागातील इतर कर्मचाऱ्यांचे सहाय्य लाभले, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर शेलार यांनी कळविले आहे.