नागपूर :- विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या विभागीय लोकशाही दिनात तीन तक्रारी प्राप्त झाल्या. उचित कार्यवाहीचे आदेश विभागीय आयुक्तांनी संबंधीत शासकीय यंत्रणांना दिले.
भंडारा जिल्ह्याच्या मांडवी तालुक्यातील कोटांगले येथील नागरिकाची नैसर्गिक नाला व पाणंद रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत जुन्या तक्रारी आणि नागपुरातील गांधी झोन मधील अतिक्रमणाबाबत दोन तक्रारींवर आज सुनावणी झाली.
भंडारा जिल्ह्याच्या तक्रारीवर येत्या महिनाभरात कार्यवाही करून याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच नागपूर महानगरपालिकेबाबत प्राप्त प्रकरणात शासकीय नियम व नोंदीच्या आधारे अहवाल स्वीकारण्यात आला. या प्रकरणातील उर्वरित विषय नझुल जागेवरील अतिक्रमणाचा असल्याने ही तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उचित कार्यवाहीसाठी पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तर या दोन्ही प्रकरणातील तक्रारदार अनुपस्थित होते.