नवी दिल्ली :- संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज 18 ऑगस्ट 2024 रोजी तामिळनाडूमध्ये चेन्नई येथे नव्याने बांधलेल्या भारतीय तटरक्षक दलाच्या अत्याधुनिक सागरी बचाव समन्वय केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन केले. त्यांनी चेन्नई बंदर परिसर पुद्दुचेरीमधील कोस्ट गार्ड एअर एन्क्लेव्ह येथे असलेल्या प्रादेशिक सागरी प्रदूषणरोधी कारवाई केंद्राचा देखील दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शुभारंभ केला. सागरी सुरक्षा आणि पर्यावरण संरक्षणासाठी देशाच्या वचनबद्धतेला बळकटी देत, भक्कम सागरी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितींना कार्यक्षम प्रतिसाद देण्यासाठी, या इमारतींची उभारणी करण्यात आली आहे.
सागरी बचाव समन्वय केंद्र
समुद्रात संकटात सापडलेल्या नाविक आणि मच्छिमारांसाठी सागरी बचाव कार्याचा समन्वय आणि परिणामकारकता लक्षणीय पद्धतीने वाढवणे हा या अत्याधुनिक सुविधेचा उद्देश आहे. जीवनाचे रक्षण करण्याच्या आणि गंभीर परिस्थितीत जलद प्रतिसाद सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या निर्धाराला ती अधोरेखित करते.
प्रादेशिक सागरी प्रदूषण प्रतिसाद केंद्र
हिंदी महासागर प्रदेशातील किनारी राज्यांना लागून असलेल्या जलक्षेत्रामध्ये सागरी प्रदूषण, विशेषत: तेल आणि रासायनिक प्रदूषणाला आळा घालण्यात समन्वय साधण्यासाठी ही आस्थापना म्हणजे अशा प्रकारची पहिली सुविधा आहे.
तटरक्षक दलाच्या पूर्वेकडील मुख्यालयाने चेन्नई बंदरात आपल्या संकुलामध्ये या केंद्राच्या उभारणीसाठी पुढाकार घेतला. यात एक आपत्कालीन प्रतिसाद केंद्र आहे जे सागरी तेल प्रदूषणाच्या घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी आयसीजी कर्मचारी तिथे 24×7 स्वरुपात तैनात राहतील. केंद्र सरकार बंदरे, तेल हाताळणी संस्था, सरकारी संस्था आणि खाजगी सहभागी यांच्यासारख्या विविध संस्थांना प्रदूषण प्रतिसाद तंत्राचे प्रशिक्षण देखील देईल. तसेच समुद्रातील तेल प्रदूषणाचा सामना करण्यासाठी मित्र देशांतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. प्रात्यक्षिक प्रशिक्षणामध्ये तेल गळतीच्या परिस्थितीत, तिचा प्रत्यक्षात जास्तीत जास्त अनुभवासाठी साठी विविध तेल हाताळणी उपकरणे प्रत्यक्ष तैनात करणे समाविष्ट असेल.
तटरक्षक एयर एन्क्लेव्ह
ही सुविधा तटरक्षक दलासाठी एक महत्त्वाचा टप्पा असून पुद्दुचेरी आणि दक्षिण तामिळनाडूलगत च्या सागरी सुरक्षेमध्ये ती महत्त्वाची भूमिका बजावेल.