गडचिरोली :- लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात आज दिनांक 19 एप्रिल रोजी मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेत सर्व मतदारांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवावा आणि भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार कर्तव्य म्हणून बजावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
सार्वत्रिक निवडणुका-2024 च्या पहिल्या टप्प्यात गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात मतदान होत असून जिल्हा प्रशासन निवडणूक घेण्यासाठी सज्ज झाले आहे. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये, म्हणून मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भिडपणे मतदान करावे.
मतदानाची वेळ
आरमोरी, गडचिरोली, अहेरी व आमगाव या विधानसभा मतदारसंघात मतदानाची वेळ ही सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत आणि ब्रम्हपुरी व चिमुर या विधानसभा मतदार संघात मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे.
उन्हापासून बचावासाठी सकाळच्या सत्रातच मतदान करावे
उन्हापासून बचावासाठी मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध असली तरी नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत सकाळच्या सत्रातच मतदान करावे, असा संदेश जिल्हाधिकारी दैने यांनी दिला आहे.