संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- येत्या 19 एप्रिल ला होऊ घातलेल्या रामटेक लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी कामठी विधानसभा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.त्यातच जे मतदार मतदान केंद्रापर्यंत जाऊन मतदानाचा हक्क बजावू शकत नाही अशा मतदारांना मतदान प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्यात आले आहे.आज 15 एप्रिल ला कामठी विधानसभा मतदार संघात 85 वर्षे वयावरील ज्येष्ठ तसेच दिव्यांग मतदाराकडून घरी जाऊन मतदान करवून घेण्यात आले.या माध्यमातून ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांनी आम्ही मतदान केले… आता तुम्हीही मतदान करा…असाच संदेश दिला आहे.
कामठी विधानसभा मतदार संघातील मतदानात सहभाग घेता येत नसलेल्या 85 वर्षोवरील ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे 12 डी चा फॉर्म भरून 99 मतदारांनी घरूनच मतदान करण्याची परवानगी मागितली होती ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक मतदार 82 व दिव्यांग 17 मतदार आहेत.त्यांच्यासाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली . दरम्यान सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गोसावी, तहसिलदार गणेश जगदाडे, नायब तहसिलदार चौधरी, नोडल अधिकारी कातकडे यांच्या मार्गदर्शनार्थ 12 मतदान यंत्रणेच्या पथकाने संबंधित मतदारांच्या घरी जाऊन सर्व नियम ,अटी, शर्तीची पूर्तता करून त्या ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांकडून मतदान करवून घेतले.घरूनच मतदान करण्याची संधी उपलब्ध झाल्याने ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांनी आनंद व्यक्त केला.