– ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत विविध ठिकाणी जनजागृती
नागपूर :- जागतिक महिला दिनानिमित्त नागपूर शहरात विविध ठिकाणी मतदार जागृतीचा जागर करण्यात आला. सिस्टिमेटिक व्होटर्स एज्यूकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन अर्थात ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीसाठी जनजागृती करण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात मनपाच्या दहाही झोनमध्ये महिला दिनानिमित्त मतदार जनजागृती करण्यात आली.
‘स्वीप’ मतदान साक्षरता कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध स्तरांवर आयोजित कार्यक्रमांचा उद्देश निवडणूक सहभागाच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करणे, महिलांना निवडणूक प्रक्रियेत सक्षम करणे हा आहे. महिला दिनासोबतच मनपाच्या विविध कार्यक्रमांमधूनही ‘स्वीप’ अभियानाचा जागर करून मतदार नोंदणी तसेच मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. नागपूर महानगरपालिका स्थापना दिवस, जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने आयोजित समारंभ, पल्स पोलिओ अभियान, विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ अशा विविध कार्यक्रमांमध्ये मनपाद्वारे ‘स्वीप’ जनजागृती अभियान राबविण्यात आले. ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या कार्यक्रमात देखील महिलांना मतदानासाठी जागरूक करण्यात आले. कार्यक्रमात मतदान करण्याचा संकल्प करणारी प्रतिज्ञा देखील घेण्यात आली.
मनपाच्या विविध शाळांमधून विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती रॅली काढली. नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे विविध शाळांमध्ये मतदार जनजागृती संदर्भात निबंध, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. याशिवाय रॅली बॅनर व सेल्फी पॉईंट देखील शाळांमध्ये उभारण्यात आले. यासोबतच मनपाद्वारे शहरात सर्वत्र पल्स पोलिओ अभियान राबविण्यात आले. या अभियानात ‘स्वीप’ मतदार जनजागृती करण्यात आली. मनपाच्या लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशीनगर आणि मंगळवारी या सर्व झोन कार्यालयांमध्ये महिला दिन कार्यक्रम आणि झोन स्तरावर विविध ठिकाणी आयोजित पल्स पोलिओ अभियानात देखील मतदार जनजागृती करण्यात आली.
लक्ष्मीनगर झोनमध्ये राजे संभाजी चौक येथे मनपाच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमाच्या प्रसंगी हजारावर नागरिकांनी ‘स्वीप’ कार्यक्रमात सहभाग दर्शवून मतदान करण्याचा संकल्प केला. याशिवाय नागरिकांनी परिसरात लागलेल्या सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढून मतदार असल्याबद्दल अभिमान व्यक्त केला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात देखील ४०० वर नागरिकांनी मतदार जनजागृती अभियानात सहभाग नोंदविला. मोरभवन बस स्थानकावर शंभरावर नागरिकांनी मतदार जनजागृती शपथ घेतली. मनपाच्या सर्व झोनमधील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुष्मान आरोग्य मंदिरे यांच्यात देखील जनजागृती संदर्भात पुढाकार घेत नागरिकांना अभियानात सामील करून घेण्यात आले.
मनपाच्या विविध केंद्रांसोबतच गांधीबाग झोनमधील शिक्षक सहकारी बँक येथील सभागृहामध्ये देखील मनपाद्वारे ‘स्वीप’ जनजागृती करण्यात आली. ८ मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त गंगाबाई घाट येथील शिव मंदिरात दर्शनासाठी येणा-या सुमारे दोन हजारावर नागरिकांना मतदानासाठी जागरूक करण्यात आले. एकूणच शहरात आयोजित विविध समारंभ, अभियान यांच्या माध्यमातून सर्वत्र मतदानाप्रति जागृतीचा जागर करण्यात आला.