ठाणे :- ‘जनतेला भेटल्यानंतर मला काम करण्याची ऊर्जा मिळते. जनतेची सेवा या ध्येयानेच मी काम करीत आहे. शासनाच्या माध्यमातून जनतेला उत्तम दर्जाची आरोग्य सेवा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील ‘मूलभूत सोईसुविधांचा विकास’ या योजनेंतर्गत मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील उभारण्यात आलेल्या “मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक सुपरस्पेशालिटी” (कॅशलेस काऊंटर) रुग्णालय तसेच मीरा-भाईंदर महानगरपालिकेने दिव्यांगांच्या उपचाराकरिता उभारलेल्या “फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्राचे ई-अनावरण व लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. तसेच जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी खरेदी केलेली वाहने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालयाला नुकतीच सुपूर्द करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोनशिलेचे अनावरण केले आणि रुग्णालयाची पाहणी केली. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आमदार प्रताप सरनाईक, आमदार श्रीमती गीता जैन, आमदार पराग शहा, माजी आमदार रवींद्र फाटक, आयुक्त तथा प्रशासक संजय श्रीपतराव काटकर, पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, उपायुक्त संजय शिंदे, उपायुक्त रवी पवार, उपायुक्त कल्पिता पिंपळे, शहर अभियंता दिपक खांबित या मान्यवरांसह विभागप्रमुख, माजी नगरसेवक/नगरसेविका, महापालिका अधिकारी – कर्मचाऱ्यांची तसेच स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हे रुग्णालय पंचतारांकित दर्जाचे आहे. या माध्यमातून लोकांना उत्तम आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे, याचे समाधान वाटते. नवनवीन विकास कामे सुरू आहेत, दहिसर ते डहाणू, विरार ते अलिबाग कॉरिडॉर मार्गाचे काम हाती घेतले आहे. ॲक्सेस् कंट्रोल, ग्रीन फील्ड पद्धतीने पनवेल-गोवा महामार्गासह इतरही महामार्गाची कामे लवकरच पूर्ण होतील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गरजू रुग्णांना कॅशलेस सेवेमुळे आवश्यक उपचार विनामूल्य मिळणार आहेत. शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत वाढ केली. मागील दीड वर्षात 180 कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातर्फे देण्यात आली. सर्वसाधारण नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विविध योजनांच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मागील काही काळात चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. आरोग्य पूर्व तपासणी (Early Detection) महत्वाची असून त्यामुळे आजाराचे निदान लवकर होवून संबंधित आजारावर लवकर मात करता येते. ‘आयुष्यमान भारत’ ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेली मोठी भेट आहे. केंद्र शासनाच्या सहकार्याने आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्र शासनही उत्तम काम करीत आहे. “फिरती आरोग्य सेवा” ही संकल्पना सर्वत्र राबवित आहोत.
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करायला हवे, असे आवाहन करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, क्लस्टर विकास (Cluster Developement) योजनेला मंजूरी देऊन त्यातून गरजू लोकांना घरे देत आहोत. राज्यात 10 लाख हेक्टर जमिनीवर बांबू लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. राज्यातील शाळा सर्व सोयीसुविधायुक्त असाव्यात, त्या माध्यमातून मुलांना चांगले शिक्षण मिळावे,यासाठीही राज्य शासन प्रयत्नशील आहे.
उत्तम काम करीत असल्याबाबत आमदार प्रताप सरनाईक, आमदार श्रीमती गीता जैन यांचे अभिनंदन करून मीरा-भाईंदर शहरातही “कॅन्सर हॉस्पिटल” उभे करू. त्याचप्रमाणे “पत्रकारांसाठी घरे” या विषयाबाबतही सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जबाबदारीने सकारात्मक वृत्तांकन केल्याबद्दल मीरा-भाईंदर परिसरातील माध्यम प्रतिनिधींचा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उत्तम काम केल्याबद्दल पोलीस आयुक्त मधुकर पांडेय व मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर यांचाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्थानिक आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक संजय श्रीपतराव काटकर यांनी केले. सूत्रसंचालन यामिनी दळवी यांनी केले तर आभार प्रदर्शन उपायुक्त (जनसंपर्क) संजय शिंदे यांनी केले.
मीरा रोड येथील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहाच्या लगतच मीरा-भाईदर महापालिकेचे पहिले कॅशलेस रुग्णालय बांधण्यात आले आहे. शहरातील पहिले व राज्यातील हे दुसरे सरकारी कॅशलेस रुग्णालय असणार आहे.या रुग्णालयात एकंदर 100 खाटांची सुविधा आहे. ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ अंतर्गत सर्व वैद्यकीय उपचार, महत्वाच्या शस्त्रक्रिया रुग्णालयात मोफत होणार आहेत. कर्करोग उपचारासह अँजिओप्लास्टी, बायपास हार्ट सर्जरी, व्हॉल्व्ह बदलणे आणि पेसमेकर अशा अनेक मोठ्या शस्त्रक्रिया व त्यावरील उपचार या ठिकाणी मोफत होणार आहेत. पिवळे आणि केशरी शिधापत्रिकाधारक रुग्णांना त्याचा लाभ मिळणार आहे. या रूग्णालयात ओपीडी सुरू होणार असून पुढील 10 दिवसात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून शासनाची मान्यता घेवून गरजू रूग्णावर आवश्यक त्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.