संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मागणी करणाऱ्या आंदोलकांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
भंडारा :- ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात भंडाऱ्यातील कार्यक्रमात गोसिखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत मागणी करणाऱ्या आंदोलनकर्त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. या मागण्यांबाबत लवकरच मंत्रालयात भेटून सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मुख्यमंत्री शिंदे हेलिपॅडवर आले असता त्यांनी या आंदोलनकर्त्याला बोलवून घेऊन त्याचे म्हणणे समजून घेतले.
‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचा पुढचा टप्पा आज भंडारा जिल्ह्यात पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असताना गोसिखुर्द प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांची मागणी मांडण्यात आली. मात्र काही वृत्तवाहिन्यांनी आणि प्रसार माध्यम प्रतिनिधींनी हा गोंधळ मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी घातल्याचे वृत्त प्रसारित केले मात्र हे वृत्त वस्तुस्थितीला धरून नाही.
गोसीखुर्द प्रकल्पबंधितांच्या प्रश्नाबाबत न्याय मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. कार्यक्रम पार पडल्यानंतर या कार्यकर्त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ दखल घेऊन मुख्यमंत्री कार्यालयाचे खाजगी सचिव अमोल शिंदे यांना त्याला हेलिपॅडपाशी बोलवायला सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांची या आंदोलनकर्त्यांशी भेट घेऊन त्याचे म्हणणे सविस्तरपणे जाणून घेतल्यावर या कार्यकर्त्यांचे समाधान झाले.
आंदोलनकर्त्यांच्या मागणीवर बैठक घेऊन सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी त्याना दिले.