नागपूर :- बहुजन समाज पार्टीचे युवा आयकाँन आकाश आनंद हे 17 नोव्हेंबर रोजी नागपुरात येत असून दुपारी सुरेश भट सभागृहात त्यांची जाहीर सभा होत आहे. या कार्यक्रमामुळे विदर्भात उत्साहाचे वातावरण तयार झाले असून विदर्भातून फुले शाहू आंबेडकरी विचारांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. ही सभा रेकॉर्डब्रेक होईल असा विश्वास बसपाचे नॅशनल कॉर्डिनेटर नितीन सिंग यांनी आज व्यक्त केला. आकाश आनंद च्या सभेच्या पूर्वतयारी साठी आज डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन उर्वेला कॉलनी येथे विदर्भातील सर्व प्रमुख पदाधीकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
मागील वर्षी 9 नोव्हेंबर 2022 रोजी आकाश आनंद प्रथमतः मुंबईत आले होते. त्यावेळी मुंबईतील सर्वात मोठे सभागृह असलेल्या षण्मुखानंद सभागृहात त्यांची प्रदेश स्तरीय भव्य सभा झाली होती.
यावेळी ते विदर्भ टार्गेट ठेवून नागपुरातील सर्वात मोठे असलेल्या सुरेश भट सभागृहात होणार आहे. त्यामुळे विदर्भातील प्रत्येक फुले शाहू आंबेडकरी कार्यकर्त्यांनी संविधान वाचवण्यासाठी फुंकलेल्या निळ्या बिगुलाला साथ द्यावी असे आवाहन याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी व विदर्भ प्रदेशचे इन्चार्ज एडवोकेट सुनील डोंगरे यांनी याप्रसंगी केले.
महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष ऍड संदीप ताजने यांनी आकाश आनंद यांच्या राज्यात चारही झोनमध्ये चार सभा असल्याचे जाहीर केले. त्यात 17 ला विदर्भ झोन मधील नागपुरात, 23 ला खानदेश परिसरातील पुणे येथे, 29 ला मराठवाड्यातील औरंगाबाद येथे, व 6 डिसेंबरला मुंबई येथे अशा चार सभा आयोजित केल्याचे घोषित केले.
याप्रसंगी मंचावर महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव नागोराव जयकर, नानाजी देवगडे, प्रदेश सचिव पृथ्वीराज शेंडे, विजयकुमार डहाट, अविनाश वानखेडे, मा प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, जिल्हाध्यक्ष ओपुल तामगडे, मा मनपा पक्षनेता जितेंद्र घोडेस्वार उपस्थित होते. या सभेकरीता विदर्भाच्या नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती आदि जिल्ह्यातून सर्व जिल्हा व विधानसभा स्तरावरील प्रमुख पदाधिकारी उपस्थित झाले होते.