नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी 9 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 55 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपाच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) नागपूर यांच्यासह केलेल्या कारवाईत 7 ठिकाणांहून 111 किलो प्लास्टिक जप्त करून 40 हजार रुपये दंड वसूल केला.
मनपाच्या धंतोली झोन उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी एमपीसीबी नागपूर यांच्यासह कारवाई करीत प्रतिबंधात्मक प्लास्टिक बाळगल्याप्रकरणी कॉटन मार्केट स्थित हरे कृष्णा ट्रेडर्स यांच्याकडून 38 किलो प्लास्टिक जप्त करून 10 हजार रुपये तर बंडू पत्रावळी यांच्याकडून 27 किलो प्लास्टिक जप्त करून 5 हजार रुपये दंड वसूल केला. तर नरेंद्र नगर येथील ग्लोब बिल्डर्स & डेव्हलपर्स यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करीत 10 हजार रुपये दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत गांधीबाग प्रभाग क्र. 19 येथील गुरू गोविंद सिंग प्लास्टिक यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक बाळगण्याप्रकरणी कारवाई करीत 40 किलो प्लास्टिक जप्त करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे रामदासपेठ येथील राम स्वर इन्फ्रा यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करीत 5 हजार रुपये दंड वसूल केला.
धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधात्मक प्लास्टिक बाळगल्याप्रकरणी गोकुळपेठ मार्केट येथील अग्रवाल डिस्पोजलस (2 किलो) आणि प्रकाश किराणा भंडार (2.5 किलो) यांच्यावर कारवाई करीत प्रत्येकी 5 हजार रुपये दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे गोळीबार चौक स्थित अंकिता प्लास्टिक (1 किलो) आणि झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे डॉ. आंबेडकर चौक सीए रोड येथील चेतन गिरे (1 किलो) यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक बाळगल्याप्रकरणी कारवाई करीत प्रत्येकी 5 हजार रुपये दंड वसूल केला. शहरातील विविध झोनमध्ये झालेल्या कारवाईमध्ये एकूण 55 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.