– नियमित लसीकरणाबाबत टास्क फोर्स समितीची बैठक
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील मनपा रुग्णालय, शासकीय व खासगी दवाखान्यांमध्ये होणाऱ्या नियमित लसीकरण संदर्भात गुरवार (ता.३१) रोजी टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली. यावेळी कोणते ही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, याकरिता बालकांच्या नियमित लसीकरणावर भर द्यावा, असे निर्देश मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी मनपाच्या सर्व वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना दिले.
मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभापती सभागृहात मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समितीच्या बैठक पार पडली. बैठकीत मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हेलन्स वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद, आयपीएचे अध्यक्ष डॉ. पाकमोडे, मनपाच्या प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. सरला लाड, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वसुंधरा भोयर , डॉ. विजयकुमार तिवारी, डॉ. सुनील कांबळे, डॉ. अतीक खान, डॉ. मेघा जैतवार, डॉ. प्रिती झरारिया, डॉ. वर्षा देवस्थळे, डॉ. बकुल पांडे, डॉ. मीनाक्षी माने, डॉ. दीपांकर भिवगडे, डाग रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. झाकीर हुसेन, सहाय्यक प्राध्यापक डॉ. भाग्यश्री गावंडे, आयुर्वेदीक महाविद्यालयाच्या पुष्पा खोब्रागडे, दीपाली नागरे, यांच्यासह लसीकरण क्षेत्र सनियंत्रक, समाजविकास कर्मचारी, इतर प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये याची दक्षता घेत, झोन निहाय ज्या बालकांचे लसीकरण झाले नसेल, अशा बालकांचे लसीकरण करण्यात यावे, असे निर्देश दिले, याशिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन लोकांमध्ये लसीकरणाविषयी जनजागृती करण्यात यावी. बालरोग तज्ञ व विविध सामाजिक संस्थांचा समावेश करून लसीकरणाविषयी नागरिकांचे असलेले भ्रम दूर करून ही मोहीम यशस्वीरीत्या राबवावी, नियमित लसीकरणासंदर्भात ‘प्लॅनिंग’ करून, झोननिहाय खासगी डॉक्टरांची बैठक घेणे आदी निर्देशही यावेळी त्यांनी दिले. ‘हाय रिस्क एरिया’ मध्ये जाऊन लसीकरणा विषयी जागृती करावी, शहरात अनेक ठिकाणी बांधकाम सुरु आहेत, तेथे देखील जाऊन लसीकरण मोहीम राबवावी, तसेच ‘ऍक्टिव्ह विझिट’ झोन वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी वाढवाव्यात असे निर्देश देखील अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी दिले.
बैठकीत सर्वप्रथम जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद यांनी झोननिहाय नियमित लसीकरण व्यवस्थेची माहिती सादर केली. तसेच संगणकीय सादरीकरणाद्वारे त्यांनी शहरातील प्रत्येक झोनअंतर्गत असलेली नियमित लसीकरणाची स्थिती मांडली. डॉ. मोहम्मद साजीद यांनी संपूर्ण शहरात नवजात बालकांचे पहिल्या दिवसांपासून इतर सर्व नियमित लसीकरण हे वेळेवर योग्यरित्या आणि शंभर टक्के व्हावे यादृष्टीने झोनस्तरावर नियोजन आणि कार्यवाही करावी असे सांगितले.
विशेष मिशन इंद्रधनुष्य ११ सप्टेंबरपासून
विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० मोहीमेचा पहिला टप्पा ७ ते १२ ऑगस्ट दरम्यान यशस्वीरीत्या राबविण्यात आला असून, दुसरा टप्पा येत्या ११ सप्टेंबरपासून राबविण्यात येणार आहे. ११ ते १६ सप्टेंबर यादरम्यान ही विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, या मोहिमेत मोठ्या प्रमाणात शून्य डोस, सुटलेले व वंचित राहिलेले लाभार्थी असलेले क्षेत्र, गोवर आजारासाठी अतिजोखमीचा भाग, नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत नवीन लसींचा समावेश केल्यानंतर कमी काम असलेले क्षेत्र, जास्त दिवस नियमित लसीकरण सत्र न घेतलेले क्षेत्र, अशा ठिकाणी बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.