– आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गडकरींची उमेदवारी रद्द करण्याची मागणी
नागपूर :- भाजप नेत्यांकडून सातत्याने बहुजनांचा अपमान केला जात असून जाती आणि धर्माच्या नावावर भाजप उमेदवार नितीन गडकरींसाठी मत मागत आहे. भाजप नेते संदीप जोशी आणि सुमीत मिश्रा यांनी इंडिया आघाडीचे बहुजन उमेदवार विकास ठाकरे यांचे वारंवार चारित्र्य हनन करत आहे. या संदर्भात सर्व पुराव्यांसह काँग्रेस नेते प्रफुल गडधे पाटील आणि आमदार अभिजित वंजारी यांनी निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे मंगळवारी (ता. १६ एप्रिल) तक्रार केली आहे.
भाजप नेते संदीप जोशी आणि आयटी सेलचा सुमित मिश्रा यांने इंडिया आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांना “सिझनल रामभक्त”, “निवडणूक आली आणि त्यांची रामभक्ती उफळून आली”, “उन्हाळी रामभक्त आणि त्यांच्या उन्हाळी गप्पा” म्हणून व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर अपलोड करुन इतर सोशल मीडियावर व्हायरलही केला आहे. याच पोस्टमध्ये भाजप नेत्यांनी नितीन गडकरी याच्यासाठी मतदान करण्याचे आवाहनही केले आहे. यातूनच नितीन गडकरींद्वारे हे सर्व प्रयोजित असल्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांच्यावरही कारवाई करुन त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणीही या तक्रार अर्जाद्वारे करण्यात आली आहे.
सुमित मिश्रा यानेही सोशल मीडियावर “बळीचा बकरा अल्ट्रा प्रो मॅक्स” असे विकास ठाकरे यांचा उल्लेख करुन त्यांचे छायाचित्रही एडिट करुन विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केला आहे. याविरोधात प्रफुल गुडधे आणि आमदार अभिजित वंजारी यांनी निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अतुल लोंढे, विशाल मुत्तेमवार, शेखर सावरबांधे यांची उपस्थित होती.