संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- प्रधानमंत्री पीक विमा योजनेची व्यापक जनजागृती व्हावी तसेच या योजनेची माहीती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी यासाठी पीक विमा कंपनीमार्फत उपलब्ध करून दिलेल्या प्रचार चित्ररथाला आज 26 जुलै ला तहसीलदार अक्षय पोयाम यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले.यावेळी प्रचार,प्रसिद्धी,साहित्याचेही अनावरण करण्यात आले.दरम्यान प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार अक्षय पोयाम यांनी यावेळी केले.
कामठी तालुका कृषी कार्यालयात महाराष्ट्र शासन व भारत सरकार द्वारे प्रायोजित खरीप हंगाम 2023-24 अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजने बाबत तालुक्यात गावोगावी जनजागृती केली जात आहे.या प्रचार रथाचे आज कामठी तहसील कार्यालयात तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पीक विमा योजने बाबत माहिती देण्याच्या उद्देशाने तसेच अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याच्या उद्देशाने कामठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रचार प्रसार करण्यात येत आहे.या अंतर्गत आज तहसीलदार अक्षय पोयाम यांनी प्रचार रथाला हिरवी झेंडी दाखवून जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे.या योजने अंतर्गत कर्जदार,बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित करण्यात आलेल्या पिकासाठी या योजनेचा लाभ घेता येईल.हवामान घटकाच्या परिस्थितीमुळे पिकांची पेरणी अथवा लावणी न झाल्यास होणारे नुकसान, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान तसेच पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होते अशावेळी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमुळे विमा संरक्षणाचे कवच मिळणार आहे.पिकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रति अर्ज केवळ ‘एक रुपया ‘भरून नोंदणी करावयाची आहे.
याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी नंदनवार,कृषी अधिकारी सागर करडुले,कृषी सहाय्यक भोयर, विमा प्रतिनिधी व इतर कर्मचारी उपस्थित होते.