– प्रतिमा मलीन होत असल्याची स्पष्टोक्ती : सोनटक्केंच्या तक्रारीने खळबळ
नागपूर :- श्री संत गाडगे महाराज मिशनविरूद्ध येवदा येथील सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे तक्रार दाखल केल्यानंतर मिशनच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर सोमवारी (ता.17) मिशनचे उपाध्यक्ष तथा आजीव ज्येष्ठ सभासद उत्तम उर्फ बापूसाहेब देशमुख यांनी नागरवाडी (ता.चांदूरबाजार) येथे पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बोलवित मिशनच्या चेअरमनसह अन्य पदाधिकाऱ्यांना चांगलेच फटकारल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
श्री संत गाडगेबाबा यांच्या विचारांना फाट देत श्री संत गाडगेबाबा मिशन मुंबईच्या चेअरमनसह अन्य पदाधिकाऱ्यांचे काम सुरू असल्याचा गंभीर आरोप नकुल सोनटक्के यांनी करत अध्यक्ष ॲड.यशोमती ठाकूर, कार्याध्यक्ष तथा चेअरमन मधुसूदन पंढरीनाथ मोहिते, उपाध्यक्ष उत्तम उर्फ बापूसाहेब अच्युत देशमुख, सचिव विश्वनाथ बापूराव नाचवणे, सचिन राजाराम घोंगटे, खजिनदार ज्ञानदेव वासुदेव महाकाळ, अशोक वसंतराव पाटील आदींच्या मालमत्तेची ईडी मार्फत चौकशी करण्याचे निर्देश राज्य माहिती आयुक्तांनी द्यावे व कार्यकारी अधिकारी वाल्मीक जोरे यांना तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी त्यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे लेखी तक्रारी द्वारे केली होती. त्यांच्या तक्रारीने मिशनच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर कर्मयोगी गाडगेबाबांचे अंतिम श्रद्धास्थान असलेल्या नागरवाडी येथे या तक्रारी संदर्भात मिशनचे उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांनी तातडीची बैठक सोमवारी (ता.१७) बोलावली होती. या बैठकीत सोनटक्के यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे केलेली तक्रार वाचून दाखवण्यात आली आहे. गाडगेबाबांच्या कार्याची जवळून माहिती असलेले जेष्ठ आजीव सभासद बापूसाहेब देशमुख यांनी मिशनची प्रतिमा मलिन होत असल्याने अशा प्रकाराला तत्काळ आळा घालता यावा यासाठी पदाधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. अशा प्रकारे माहिती उपलब्ध करून न देणे हे कायद्याला सुसंगत नसल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे मिशनमध्ये सत्तेत असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची चांगलीच वाळू सरकली आहे. या बैठकीला चेअरमन मधुसूदन पंढरीनाथ मोहिते, सचिव सचिन राजाराम घोंगटे, मुंबई येथील धर्मशाळेचे एकनाथ ठाकूर, प्रशांत देशमुख, अमोल ठाकुर, पंढरपुर येथील राधेश्याम बादले, नाशिक येथील कुणाल देशमुख, मूर्तिजापूर येथील सागर देशमुख, दर्यापूर येथील गजानन देशमुख, नांदेड येथील रामेश्वर ढानकीकर यांच्यासह अन्य उपस्थित होते. शांत व संयमी स्वभावाचे असणारे बापूसाहेब देशमुख हे कधीच आक्रमक होत नाहीत. मात्र कालच्या बैठकीत त्यांनी चांगलीच टोकाची भूमिका घेतल्याचेही बैठकीत असलेल्यांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले.
मिशनचे पदाधिकारी अमरावतीत
नकुल सोनटक्केंनी राज्य माहिती आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीचे वृत्त राज्यभरातील विविध दैनिकांना झळकल्यामुळे श्री गाडगे महाराज मिशन मुंबईच्या पदाधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची माहिती आहे. बापूसाहेब देशमुख यांनी या प्रकाराबाबत बैठकीत तीव्र नाराजी बोलून दाखवल्याची सुत्रांची माहिती आहे. मिशनचा कारभार हाकणाऱ्यांची त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली. बैठकीनिमित्त मिशनचे पदाधिकारी नागरवाडीत दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी अमरावती सुद्धा काही काळ विश्राम केल्याची माहिती आहे.