– जागतिक योग दिनानिमित्त आयोजन
– मनपात विविध सामाजिक संस्थांची बैठक; उपायुक्तांनी घेतला तयारींचा आठवा
नागपूर :- जागतिक योग दिनाचे औचित्यसाधून नागपूर महानगरपालिकेच्या वतीने येत्या बुधवार २१ जून रोजी धंतोली स्थित यशवंत स्टेडियम येथे सकाळी ६. 00 वाजता सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मनपा पूर्णतः सज्ज आहे. योग दिवसानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाची तयारी, स्वरूप आणि विविध संस्थांच्या सूचना जाणून घेण्याच्या दृष्टीने गुरुवार (ता.१६) रोजी मनपाचे उपायुक्त सुरेश बगळे यांच्या अध्यक्षतेत बैठकीचे आयोजन करण्यात आले.
मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात आयोजित बैठकीला मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, क्रीडा विभागाचे नियंत्रक अधिकारी नितीन भोळे, उज्वला चरडे यांच्यासह जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाचे अतुल मुजुमदार, प्रशांत राजूरकर, मिलिंद वझलवार, इंडो ग्लोबल सोसिअल सर्व्हिस सोसायटीच्या शाहीना शेख, आर्ट ऑफ लिविंग संस्थेच्या वसुधा धकाते यांच्यासह श्री आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर, व्ही.एन. रेड्डी फाउंडेशनचे स्वयंसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत मनपाचे उपायुक्त सुरेश बगळे यांनी सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाच्या तयारींचा आठवा घेत, योग दिनाच्या आयोजनासंदर्भात सर्व संस्थांच्या सुचना नवकल्पना मागविल्या व आवश्यक त्या सुचनांवर चर्चा करून त्याबाबत कार्यवाहीचे निर्देश दिले. अनेक संस्थांनी योग दिनाला आपल्या तयारीची माहिती दिली.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना मनपाचे उपायुक्त सुरेश बगळे यांनी सांगितले की, जागतिक योग दिवसाच्या निमित्ताने होणा-या भव्य आयोजनाचा उद्देश हा शहरात योगाचा प्रचार, प्रसार करणे आहे. नागरिकांना योगाचे महत्व पटावे त्यांनी योगासाठी पुढे यावे या हेतून योग मंडळ व संस्थांच्या सहकार्याने दरवर्षी मनपातर्फे भव्य आयोजन केले जाते. नागरिकांमध्ये योगाप्रती जनजागृती व्हावी व ते योगाकडे वळावेत यासाठी योग दिनानिमित्तच्या आयोजनाला यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.